ॲड. अमित जामसंडेकर यांनी घेतली भारताच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची पदाची शपथ  

26
देवगड / प्रतिनिधी

ॲड. अमित जामसंडेकर यांनी घेतली भारताच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची पदाची शपथ  

बौद्धिक संपदा व व्यावसायिक खटल्यातील अग्रणी ॲड. अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे मंगळवारी आयोजित एका विशेष सोहळ्यात त्यांना न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. या सोहळ्याला महाराष्ट्राचे महाअधिवक्ता, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ॲड. जामसंडेकर यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी १९ ऑगस्ट २०२५ रोजी नेमणुकीची शिफारस केली. या शिफारसीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून २६ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील कार्यवाही करून मंजुरी देण्यात आली. भारताच्या राज्यघटनेच्या कलम २२४ (१) नुसार २७ ऑगस्ट रोजी भारताच्या राष्ट्रपती श्र श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी ॲड. जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक केली व त्याला भारत सरकारच्या गॅझेटमध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. मंगळवारी ॲड. जामसंडेकर यांनी न्यायमूर्तीची पदाची शपथ घेतली. ॲड. जामसंडेकर देवगड शिक्षण विकास मंडळाच्या नियामक समितीचे सदस्य असल्याने त्यांचा न्यायमूर्ती पदाच्या शपथविधी सोहळ्याचे सहक्षेपण संस्थेच्या देवगड महाविद्यालयाच्या सभागृहात दाखविण्यात आले. यावेळी देवगड शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली, नियामक समितीचे सभापती एकनाथ तेली, संस्थेचे सहसचिव तुकाराम तेली, चंद्रहास मर्गज यांच्यासह देवगड येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अविनाश माणगांवकर, प्रमोद नलावडे, प्रकाश गोगटे, मधुकर नलावडे आदी उपस्थित होते.
एकनाथ तेली म्हणाले, न्या. जामसंडेकर यांच्या यशाची प्रेरणा आजच्या पिढीतील युवकांनी घेतली पाहिजे. शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीतून यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. अविनाश माणगांवकर, प्रमोद नलावडे, प्रकाश गोगटे, प्रा. सुनेत्रा ढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत शिरसाटे यांनी केले. तर आभार प्रा. कांबळे यांनी मानले.
न्यायमूर्ती जामसंडेकर यांचा कायदेशीर क्षेत्रातील प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. देवगडसारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषदच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन शेठ म. ग. हायस्कूल येथून माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे देवगड महाविद्यालयातून ग्रामीण विकासमधून पदवीचे शिक्षण पूर्ण करून मुंबई येथून शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठ येथून कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर लिसेस्टर विद्यापीठमधून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी १९९८ पासून भारतात वकिलीला सुरुवात केली. तर २००१ पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात काम करायला सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये बाजू यशस्वीपणे मांडली आहे. वकील म्हणून त्यांनी २८ वर्षे काम केले असून विशेषतः घटनात्मक, दिवाणी कायद्याशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांचा अभ्यास आणि अनुभव अत्यंत दांडगा आहे. त्यांची बौद्धिक संपदा व व्यावसायिक खटल्यामध्ये अग्रगण्य म्हणून गणना होते. ते विविध देशांत वकिली क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र असताना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वकिली व्यवसाय अत्यंत जोमात सुरू असताना फक्त देशाच्या न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम पाहणे हे विशेष उल्लेखनीय आहे.
उच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती त्यांच्या कायदे विषयक ज्ञानाची खोली आणि व्यावसायिक सचोटीचा गौरव मानली जात आहे. त्यांचे हे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळेच न्यायमूर्ती पदासाठी त्यांची निवड झाली आहे.
न्यायमूर्ती जामसंडेकर हे बौद्धिक संपदा विषयातील महाराष्ट्रातील प्रथम न्यायमूर्ती आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट नियुक्तीने उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा त्यांना मान मिळाला असून त्यांची नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक पात्रतेचा गौरव नसून न्यायव्यवस्थेची प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग न्यायालयातील प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी होईल आणि सामान्य नागरिकांना वेगाने न्याय मिळण्याची आशा बळकट होईल.