बांदा : अभ्यासासोबत क्रीडा स्पर्धांची आवड असणे महत्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी करियर म्हणून स्पर्धेत उतरावे. शाळेच वय हे इमारत बांधण्यात नव्हे तर विद्यार्थ्यांच्या यशात दिसून येते. कोकणातील समस्या सुटण्यासाठी येथील विद्यार्थी अधिकारी बनणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, सावंतवाडी तहसिलदार अरूण उंडे यांनी केले.
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोसच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी तहसिलदार श्री.उंडे बोलत होते. व्यासपीठावर करियर गाइडन्स समुपदेशक प्रा.रुपेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य अल्ताफ खान, प्रा.प्रभाकर नाईक, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, माजी अध्यक्ष भाऊ कामत, उपाध्यक्ष श्री.सावळ, सचिव शांताराम गावडे, खजिनदार बाळा मोरजकर, आरोस पोलिस पाटील महेश आरोसकर, उपसरपंच सरीता नाईक, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन परब, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, आरोस ग्रा.पं.सदस्या मनिषा परब, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपेश पाटील म्हणाले की, आपल्या घरच्या परिस्थितीचे भांडवल करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याच धाडस करा. भांडवल करणारे कधीच यशस्वी होत नाही उलट परिस्थितीवर मात करणारे इतिहास बदलतात आणि भांडवल करणारे तोच इतिहास वाचून गप्प असतात. स्पर्धा परिक्षांची कास धरा, आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्या असे मार्गदर्शन केले.
अल्ताफ खान, प्रभाकर नाईक, हेमंत कामत आदींनी विचार व्यक्त केले. दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी रिया घोगळे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श विद्यार्थी अपूर्वा नाईक, आदर्श शिक्षक विवेकानंद सावंत, आदर्श पालक संतोष पिंगुळकर, कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली मयुरी आरोसकर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय आलेल्या प्रा.सुषमा मांजरेकर आणि सहायक शिक्षिकाअनुष्का गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक निलेश देऊलकर यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा मांजरेकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केला. हस्तलिखीतचे प्रकाशन तहसिलदारांच्या हस्ते करण्यात आले. गुणगौरव सूत्रसंचालन मोहन पालेकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी मानले.





