मळेवाड येथे घरफोडी; रोख रक्कम लंपास चोरटा पोलिसांच्या ताब्यात

502
सावंतवाडी (प्रतिनिधी)

मळेवाड येथे घरफोडी; रोख रक्कम लंपास चोरटा पोलिसांच्या ताब्यात

 

मळेवाड चव्हाणवाडी येथील बंद घर फोडून ५ हजारांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले. सचिन केतकर (रा. मळेवाड) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चिरेखाणीवर कामानिमित्त वास्तव्य करणारे भाडेकरू विरेश गौडा हे गावी गेले होते, तर त्यांचे सहकारी खाणीवर कामावर गेले होते. याचा फायदा घेत संशयिताने घराच्या मागील दरवाज्याचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. टेबलाच्या ड्रॉवरमधून ५ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर लोखंडी कपाट उघडून ऐवज चोरण्याचा प्रयत्न सुरू असताना, गावीहून परतलेल्या विरेश गौडांनी घरात हालचाल जाणवताच आत पाहिले असता सचिन केतकर दिसून आला.

 

केतकरला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढला. गावकऱ्यांच्या मदतीने विरेश गौडांनी आरोपीची ओळख पटवली. यानंतर आरोंदा पोलिस दुरक्षेत्राचे बीट अंमलदार अरवारी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबू जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत चोरीची पाहणी केली.

 

सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केतकरला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत काही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, उर्वरित रकमेबाबत तपास सुरू आहे.