फोंडा-वैभववाडी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी –

19

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

फोंडा-वैभववाडी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी –

फोंडा वैभववाडी उंबर्डे तसेच उंबर्डे भुईबावडा दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ पावसाळी डांबर किंवा सिमेंट काँक्रीटने बुजवण्यात यावेत. अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दिला आहे. उंबर्डे वैभववाडी फोंडा भुईबावडा या राज्यमार्गाचे नूतनीकरणाचे काम सन 2020-21 मध्ये करण्यात आले होते. परंतु वैभववाडी दरम्यान लोरे नं. 1 पासून वैभववाडी बाजारपेठ संभाजी चौकापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
त्याचप्रमाणे कुसुर ते उंबर्डे व उंबर्डे ते भुईबावडा दरम्यानही ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता आहे.
गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असून, या उत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी येत असतात. त्यामुळे वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन येत्या 15 दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळी डांबराने किंवा सिमेंट काँक्रीटने बुजवण्यात यावेत अशी मागणी लोके यांनी केली आहे. अन्यथा या खड्ड्यात वाहन चालकांना घेऊन वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी यांना दिला आहे.