देवगड- जामसंडे नगरपंचायतीची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा ठेकेदारांच्या विषयावरून गाजली

44
देवगड / प्रतिनिधी

देवगड- जामसंडे नगरपंचायतीची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा ठेकेदारांच्या विषयावरून गाजली

देवगड- जामसंडे नगर पंचायतीची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा ठेकेदारांच्या विषयावरून गाजली. जनतेच्या सोयीसुविधांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला जातो. मात्र ठेकेदाराकडून वेळेत कामे पूर्ण होत नसतानाही त्या कामांना वाढीव दिवसांचा कालावधी दिला जातो. न. पं. ला सक्षम ठेकेदार का मिळत नाही ? न. पं. प्रशासन ठेकेदारांच्या अजून किती आहारी जाणार आहे ? असा सवाल नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. मनमानीपणे सभागृहात कोणतेही बेकायदेशीर निर्णय घेण्यात येऊन त्यावर कोणत्याही प्रकारचे चुकीचे ठराव घेतले गेले तर प्रशासनाची गय करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

 

देवगड- जामसंडे न. पं. ची सर्वसाधारण सभा न. पं. सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर न. पं. बांधकाम समिती सभापती शरद ठुकरुल,आरोग्य व स्वच्छता सभापती आद्या गुमास्ते , प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नगर अभियंता विवेक खोत आदी उपस्थित होते. न. पं. हद्दीतील नळग्राहकांना २०१८ च्या उपविधीनुसार नळकनेक्शन देणे आवश्यक असून कुणाचेही नळकनेक्शन बंद करण्यात येऊ नये. ठराव घेऊन तात्काळ नळधारकांना नोटीस पाठविणे अयोग्य असून त्यावर चर्चा होणे महत्वाचे आहे. सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणारे विषय इतिवृत्तात नमूद होत नसून केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नाही. प्रसंगी सभागृहात चर्चा होत असताना आवश्यक ती ठोस कार्यवाही माहिती प्रशासनामार्फत सभागृहात दिली जात नसल्याने नगरसेवक नितीन बांदेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

पंतप्रधान आवास योजनेच्या इमारतींचे काम दर्जेदार व्हावे. त्यात मक्तेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाचे काम करून लाभार्थीचा जीव धोक्यात जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. काही ठेकेदारांकडे एकापेक्षा अधिक कामे देण्यात आली असल्याने कामे अर्धवट स्थितीत राहत आहेत. त्यामुळे कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना बिले अदा करण्यात येऊ नये, अशी सूचना नगरसेवक संतोष तारी यांनी केली. काही ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन संपलेले असतानाही त्या ठेकेदारांना कामे दिली जात आहेत व त्यांची बिलेही प्रशासनाकडून अदा केली जात असल्याचे नगरसेवक बुवा तारी यांनी सांगितले. अपूर्ण कामांबाबत नियमानुसार दंड वसूल करून एक महिन्याचा वाढीव कालावधी सहानुभूतीपूर्वक देण्यात यावा, असा ठराव यावेळी घेण्यात आला. न. पं. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाबाबत सभागृहात ठराव घेऊन तसेच पालकमंत्र्यांनी सूचना करूनही कर्मचाऱ्यांना किमान वेतन अद्याप लागू करण्यात आलेले नाही. यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली. दहिबाव उद्भवावर आधारीत पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण व बळकटीकरणाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नळयोजनेच्या इतर कामांवर निधी खर्च केला आहे. संबंधित बदलासाठी कोणतेही सुधारीत अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता घेण्यात आलेली नाही.
त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे उर्वरित बिल अदा करणे अयोग्य असल्याचे प्रशासनाने इतिवृत्तातून नमूद केल्याची बाब नगरसेवक बुवा तारी यांनी सभागृहासमोर स्पष्ट करून या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. सभापती आद्या गुमास्ते यांनी गणेशोत्सवातील स्वच्छता नियोजनाची माहिती दिली. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना न. पं. महिला व बालकल्याण समिती उपसभापती रुचाली पाटकर यांनी केली.
देवगड व तारामुंबरी स्मशानभूमीत अर्धवट स्थितीत जळून राहणाऱ्या पार्थिवांची कुत्र्यांकडून हेळसांड केली जात असून तेथे उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक व्ही. सी. खडपकर यांनी केली. दहिबाव नळयोजनेच्या पाईपलाईनला गळतीचे प्रमाण अधिक आहे. या नळयोजनेच्या संबंधित ठेकेदाराचे दुरुस्तीच्या कामाचे यापूर्वीच बिल अदा करायचे आहे. नळयोजना पुन्हा नादुरुस्त झाल्यास व संबंधित ठेकेदाराने दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिल्यास पाणी पुरवठा ठप्प होऊ शकतो, अशी माहिती पाणी पुरवठा विभागप्रमुख चारुदत्त पारकर यांनी सभागृहाला दिली.
यावर नगरसेवक बुवा तारी यांनी कार्योत्तर मंजुरी घेऊन दुरुस्तीचे काम करून घ्यावे, अशी सूचना केली. यावेळी नगरसेविका तन्वी चांदोस्कर, नगरसेविका अरुणा पाटकर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, रोहन खेडेकर, सुधीर तांबे आदी उपस्थित होते.