आरोंद्यात बिबट्याचा हल्ला ; वासराचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

248

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

आरोंद्यात बिबट्याचा हल्ला ; वासराचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

आरोंदा रेडकरवाडी येथे बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी विनायक अर्जुन रेडकर यांच्या घराशेजारील गुरांच्या गोठ्यात शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याने गोठ्यात घुसून गाईच्या वासरावर हल्ला केला, ज्यात वासराचा जागीच मृत्यू झाला.
जंगलतोड वाढल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असून पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले करत आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी श्री. प्रकाश रानगिरे आणि श्री. पडते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी आरोंदाचे उपसरपंच श्री. गोविंद (आबा) केरकर आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. सिद्धेश नाईक उपस्थित होते.
वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वनविभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे उपसरपंच गोविंद केरकर यांनी सांगितले.