देवगड प्रतिनिधी
मिलिंद सदानंद पवार शाळेत भरला रानभाज्यांचा बाजार
देवगड एज्युकेशन बोर्ड संचालित. मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्या अळू, टाकळा, तोंडली, करटोली, भारंगी, अळंबी शेवगा, फोडशी, कुड्याच्या शेंगा यांसारख्या विविध भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख तर झालीच पण त्या आरोग्यासाठी सुद्धा किती महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व सुद्धा शिक्षकांनी, तसेच मुख्याध्यापकांनी पटवून सांगितले. त्याचबरोबर एखादी गोष्ट विकण्यासाठी किती मेहनत करावी लागते या मेहनतीचा सुद्धा अनुभव विद्यार्थ्यांना आला. या मेहनतीचा अनुभव आल्यामुळे भविष्यात हे विद्यार्थी नक्कीच काटकसरी बनतील अशी आशा वाटते.
या अभिनव उपक्रमासाठी संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तसेच महत्त्वाचा म्हणजे पालक वर्ग या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पालकांचा तसेच इतर नागरिकांचा देखील छान प्रतिसाद मिळाला.