आचरा (प्रतिनिधी)
तळाशील रस्ता आणि किनारा यांच्यात उरले काही फुटांचे अंतर ; वस्तीच्या दिशेने लाटांचे आक्रमण वाढले
पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले रोखून
समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तळाशील किनाऱ्याला फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसत आहे. समुद्राच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. बंधारा नसलेल्या भागात खाडी आणि सागर किनारा यांच्यातील अंतर काही मीटरचे राहिले असल्याने तळाशीलवासीयांचे जीवन भीतीदायक बनले आहे. आज आलेल्या उधाणाच्या भरतीत सुमारे १० मीटर रुंदीचे किनाऱ्याचे क्षेत्र समुद्राने एका दिवसात गिळंकृत केले आहे.
हे उधाण आणखी तीन दिवस टिकणारे असल्याने धोका वाढला आहे. वारंवार बंधाऱ्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहणी करण्यासाठी आलेल्या पतन विभागाच्या सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांना ग्रामस्थांनी आक्रमक होत रोखून धरले होते जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.





