खा. राणे यांनी बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला  ! माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका

34

 

कणकवली (प्रतिनिधी)

खा. राणे यांनी बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला  ! माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका

वैभव नाईक यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी कधी करणार, अशी विचारणा केल्यानंतर खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येऊन गेले.पण खा. राणे यांनी केवळ शासकीय बैठकीचा सोपस्कार पूर्ण केल्याची टीका शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले,मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असून खासदारांच्या बैठकीला महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली. राणेंच्या गावात जाणाऱ्या वरवडे गावातील जानवली नदीवरील पुलाचे काम अपूर्ण आहे.त्यामुळे ४ किलोमीटरचा वळसा जनतेला पडत आहे. त्याबद्दल ही राणेंनी बैठकीत वाच्यता केली नाही. २०२४ साली अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप जनतेला मिळालेली नाही. मात्र, त्याबद्दलही राणे काही बोलले नाहीत. आताही झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे होतील, पण त्याची भरपाई देण्यासाठी शासनाकडे निधीच उपलब्ध नाही. लाडक्या बहिणींच्या योजनेला निधी दिल्यामुळे जनतेला नुकसान भरपाई देण्यास शासन हतबल आहे. शेतकºयांपेक्षा लाडक्या बहिणींकडे शासनाचे लक्ष आहे.

खा. राणे यांनी सिंधुदुर्गात एक दिवस आणि रत्नागिरीत एक दिवस दौरा करून लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्याचे दाखवले.अतिवृष्टीमुळे जनतेच्या झालेल्या नुकसानीची पाहणीही राणेंनी केली नाही. यावरून राणे प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर हे निवडणुकी पुरते जनतेच्या दारात येतात. मात्र, निवडून झाल्यानंतर राणे जनतेकडे दुर्लक्ष करतात हे पुन्हा सिद्ध झाल्याची टीकाही उपरकर यांनी केली.