सावंतवाडी (प्रतिनिधी)
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ उत्साहात
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ.जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात कॉलेजचा शैक्षणिक आलेख मांडत विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. सोबतच शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचाही उल्लेख केला.





