सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्याच्या १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा तीव्र विरोध 

13

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्याच्या १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा तीव्र विरोध 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्याच्या १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाला ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांच्याकडे निवेदन सादर करून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

माहीम मुंबई चे उबाठा चे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी निवेदन दिले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब,शब्बीर मणीयार ,शिवदत्त घोगळे,समिरा खलील , नामदेव नाईक, बाळु गवस व शिवसैनिक उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे , १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या भागातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून, अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच, तीन तालुक्यांतील भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आहे ते विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेनेने या निर्णयाला ‘चुकीचा’ आणि ‘विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा’ असल्याचे म्हटले आहे.

 

तसेच, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीने अभ्यासपूर्ण शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.प्रमुख मागण्या:१५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करावा.आर.टी.ई. ऍक्टच्या शेड्युलमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व संच मान्यता करावी. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळ सुचविलेली आर.टी.ई. ऍक्ट.च्या शेड्युलप्रमाणे योजना शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताच्या असल्यामुळे त्वरित अमलात आणावी, अशी मागणी केली आहे. आमदार महेश सावंत म्हणाले, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहेत. मी शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे तसेच येणाऱ्या अधिवेशनात विषय मांडला जाईल.

विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, नदी नाले, डोंगराळ भाग असल्याने शाळा व माध्यमिक विद्यालय निर्माण झाली होती तीच साखळी मोडीत काढून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. तर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ग्रामीण आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणाऱ्या निर्णयाला विरोध राहील. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

 

 

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून गेल्याने सावंतवाडी शहराचे महत्त्व कमी झाले. आता शक्तिपीठ महामार्ग देखील बाहेरून जाणार असल्याने सावंतवाडी शहराचे महत्त्व आणखी कमी होईल असे ठाकरे शिवसेनेचे माहीम मुंबईचे आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे.
आमदार सावंत म्हणाले, स्वार्थ ठेवून आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शविला आहे. केसरकर यांच्या जवळच्या लोकांच्या त्या परिसरातील गुंतवणूकदारांच्या जमिनींना सोन्याचा भाव मिळेल.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार,मायकल डिसोझा, संजय गवस व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सावंत म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग बाहेरून गेल्याने सावंतवाडी शहराचे महत्त्व कमी झाले. आता शक्तिपीठ महामार्गही बाहेरून गेल्याने सावंतवाडीत पर्यटन येणार नाहीत, तेही महत्त्व कमी होईल.केसरकारांचे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन म्हणजे स्वार्थ आहे. त्यांच्या जवळच्या गुंतवणूकदारांनी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या, एकरी दहा ते बारा हजार रुपये मोजले आणि आता रस्ता झाला तर गुंठ्यांमागे दहा ते वीस लाख रुपये भाव मिळेल. सोन्याचा भाव जमिनींना मिळणार म्हणूनच केसरकर शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. गुंतवणूकदारांनी चार ते पाच हजार हेक्टर जमीनी घेऊन ठेवल्या आहेत ,अशी माझ्याकडे माहिती आहे. आपल्या जवळच्या उद्योजकांच्या जमिनींना चांगला भाव मिळावा म्हणूनच केसरकर शक्तिपीठ मार्गाचे समर्थन करत आहेत. मात्र त्यामुळे सावंतवाडी शहराचे मोठे नुकसान होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

आमदार सावंत म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला तेथील लोकांचा विरोध असला तर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि सरकार दरबारी आवाज उठवू. स्थानिकांना अभिप्रेत भूमिका घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

जात निहाय्य सर्वेक्षणाबाबत विचारले असता आमदार महेश सावंत म्हणाले, प्रत्येक पक्षात जात निहाय डाटा असतो. सरकारचा काय हेतू आहे ते माहित नाही. मताधिक्य पाहून प्रभाग फोडायचे असतील. फायद्याचे प्रभाग बनवायचे असतील. मताधिकाच्या आघाडीवर ते प्रभाग बनवणार असतील. भाजपची सत्ता आल्यानंतर जातपात उफाळून आला आहे. जात पात आणि हिंदू मुस्लिम हे भाजपच उरकून काढत आहे.शिवसेना आणि काँग्रेसने कधीही जात-पात पाहिली नाही.