सावडाव अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अधिकारी नियुक्त करा – मधुरा पालव यांची मागणी ; जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
कणकवली तालुक्यातील सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला संघटक मधुरा पालव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना दिले. मधुरा पालव यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावडाव ग्रामपंचायत मधील पथदीप आणि रस्ता कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार नयना सावंत आणि वैभव सावंत यांनी माहिती अधिकारातून उघड केला आहे. त्या रागातून सावडावचे उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नयना सावंत व वैभव सावंत यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे आज ही नयना सावंत व वैभव सावंत हे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र अमानुष मारहाण व विनयभंगाचा गुन्हा घडूनही अद्यापपर्यंत कणकवली पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम ३०७ दाखल करून कारवाई केलेली नाही. या आरोपीना कोर्टातून जामीन मिळविण्यासाठी मुभा मिळावी याकरिता कणकवली पोलीस सहकार्य करत असल्याचे दिसून येत अाहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नियमबाह्य पद्धतीने काम करण्यासाठी उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांचे सहकारी गावात दहशत निर्माण करत आहेत, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस पाठीशी घालत आहेत हे दुर्दैवी आहे. तरी सावडाव येथील नयना सावंत, वैभव सावंत यांना अमानुष मारहाण अाणि विनयभंगाच्या गुन्ह्यात आपण स्वतः गांभीर्याने लक्ष घालून संबंधित आरोपींवर कलम ३०७ दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत तसेच सदर तपास कामासाठी महिला पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जिल्हा संघटक मधुरा पालव, तालुका संघटक माधवी दळवी यांनी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.