सावंतवाडी (प्रतिनीधी)
कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचे निवेदन
कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचा/निवेदनाचा एक ई-मेल समितीच्या वतीने समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य आणि केंद्र सरकार मधील संबंधित लोकप्रतिनिधींना केला आहे.
या निवेदनात समिती म्हणते, ”मुंबई आणि मंगळुरु ही दोन बंदरे जोडण्याच्या दृष्टीने रोहा ते मंगळुरु दरम्यान नवीन ब्रॉडगेज मार्ग बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्य शासनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. १५ वर्षांनंतर किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. त्यानुसार वर्ष २००८-०९ मध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता असताना केंद्र शासनाने सर्व देणी देऊन झाल्यावरही हे महामंडळ स्वतंत्रच राहील असे प्रथम आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात ठरवले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. ०७.०१.२००९ चे पत्र क्र. 2007/PL/50/7). त्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वे महामंडळ Sick Company म्हणून गणले जाऊ नये याकरिता द्वितीय आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात कोकण रेल्वेतील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे ४०७९.५१ कोटींचे Non-Cumulative Redeemable Preference Shares (RPS) चे रूपांतर Compulsorily Convertible Non-Cumulative Preference Shares (CCPS) मध्ये करण्यात आले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. २६.१२.२०१७ चे पत्र क्र. 2015/PL/50/9).
रोहा – वीर दुहेरीकरणानंतर दि. १६.०८.२०१६ ला रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ किमीच्या मार्गाच्या टप्पा दुहेरीकरणाच्या आणि २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५०% समभाग (Equity) आणि ५०% कर्जाच्या रूपात उभा करण्याचे ठरवले. दि. २६.०६.२०१८ ला रेल्वेच्या विस्तारित बोर्डाने (Expanded Board for Railways) या प्रकल्पाची किंमत ४९८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नंतर हा प्रस्ताव कॅबिनेट समितीकडे व त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. दि. १८.०६.२०१९ ला त्याविभागाने प्रस्तावाला मान्यता दिली व संबंधित राज्य शासनांकडून (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) निधी देण्याबद्दल लेखी हमीची मागणी केली. त्यात महाराष्ट्र ४९६.४६९ कोटी, गोवा १३५.४०१ कोटी, कर्नाटक ३३८.५०२ कोटी आणि केरळ १३५.४०१ कोटी असा आर्थिक सहभाग अपेक्षित होता.
कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून आर्थिक सहभागाची हमी देण्याबाबत विनंती केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. ३० ऑगस्ट, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion). राज्यांकडून निधी मिळण्यास उशीर झाल्यास एकूणच प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम एकूणच प्रगतीवर होऊ नये याकरिता राज्यांनी तो निधी प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच एकरकमी देण्यासंदर्भात लेखी हमी मागितली. पूर्वीच्या पत्राला उत्तर न आल्यामुळे व केंद्रीय कॅबिनेटच्या नवीन सूचनांनुसार महाराष्ट्राकडून अपेक्षित असलेला ४९६.४६९६ कोटींचा निधी एकरकमी देणेबाबत कोकण रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना सूचित केले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १३ सप्टेंबर, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion).





