होय , मी आमदारकी साठी इच्छुक : धोंडी चिंदरकर यांनी केली दावेदारी जाहीर, वरिष्ठ नक्कीच विचार करतील…..

177

मालवण (प्रतिनिधी)

होय , मी आमदारकी साठी इच्छुक : धोंडी चिंदरकर यांनी केली दावेदारी जाहीर, वरिष्ठ नक्कीच विचार करतील…..

भविष्यात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार मतदारसंघ निर्माण होणार असून यापैकी एका मतदार संघातून आपण आमदारकीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सुतोवाच करत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आतापासूनच आपली दावेदारी जाहीर केली आहे.

दरम्यान, मी अशा प्रकारे आमदारकीची इच्छा व्यक्त केल्याने काहीजण अधिक जोमाने कामाला लागतील असा टोलाही विरोधकांना लगावला आहे. चिंदरकर यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चांना उधाण आले आहे.

जिल्ह्यात होणार चार मतदार संघ……

चिंदरकर म्हणाले, ज्याप्रकारे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण आहे, त्याच प्रकारे २०२६ नंतर विधानसभा आणि लोकसभा मतदार संघांमध्येही आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. तेव्हा मतदार संघांमध्ये आरक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा अन्य बाबतीत जी रचना असेल त्याचा आता अंदाज लावता येणार नाही. मात्र जिल्ह्यात किमान चार विधानसभा मतदारसंघ निर्माण होणार आहेत एवढे मात्र नक्की. त्यावेळी माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदारकीसाठी इच्छुक असेल.

भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष……

भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने २०२९ च्या विधानसभा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली तर भाजपा याचा नक्कीच विचार करील. आमचे नेते खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पालक मंत्री नितेश राणे आणि मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे हे सुद्धा सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करतील अशी अपेक्षाही श्री चिंदरकर यांनी व्यक्त केली.

विरोधकांना टोला…….

चिंदरकर यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने निर्माण होणाऱ्या चौथ्या मतदारसंघासाठी आतापासूनच आपली दावेदारी जाहीर करतानाच विरोधकांनाही टोला लगावला आहे. आपण अशा प्रकारे इच्छा व्यक्त केल्याने आता काही जण अधिक ताकतीने कामाला लागण्याचा प्रयत्न करतील असे चिंदरकर म्हणाले आहेत. चिंदरकर यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.