एकांकिका स्पर्धेत देवगड महाविद्यालयाचे यश

8

 

देवगड- प्रतिनिधी

एकांकिका स्पर्धेत देवगड महाविद्यालयाचे यश

 

 

मुंबई- माटुंगा येथील यशवंत नाटमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘मशाल’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेत कोल्हापूर येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘व्हाय नॉट’ या एकांकिकेने प्रथम, तर पुणे येथील आयएमसीसी महाविद्यालयाची ‘सखा’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला.
या महाअंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासह जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष उन्मेष वाघ, सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, अभिनेत्री व निर्माती मुक्ता बर्वे आणि लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन आदी उपस्थित होते. महाअंतिम फेरीत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या आठ विभागातील एकांकिकांचे सादरीकरण झाले.
देवगड महाविद्यालयाच्या ‘मशाल’ या एकांकिकेत दीपक दशरथ जानकर, आकाश सुनील सकपाळ, साहिल दीपक जाधव, विराज राजन तेली, यश हर्षद गोळम, प्रतीक अजित चव्हाण, साहिल दिलीप जाधव, शिवमणी अजय पाळेकर, विनित शांताराम चव्हाण, ओंकार प्रमोद सोनकुसरे, पियुष दीपक केतकर, हर्षित अभय कोयंडे, दिलीप पांडुरंग जंगले हे कलाकार सहभागी झाले होते. लेखक अनिरुद्ध नारिंग्रेकर लिखित या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेंद्र बोडेकर यांनी, नेपथ्य दीपक जानकर यांनी, प्रकाश योजना सोहम ठाकुर यांची, तर संगीत संकेत सखाराम घाडी, सत्येम शिवाजी जामसंडेकर, आकाश सकपाळ यांचे लाभले होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन निवेदक कुणाल रेगे यांनी केले.