४ ते ८ डिसेंबर या कालवधीत भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बुधवार ४ डिसेंबर ते रविवार ८ डिसेंबर या कालावधीत ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कनकनगरीत साजरा होणार आहे
योगतपस्वी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव बुधवार ४ डिसेंबर ते रविवार ८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी कनकनगरीत साजरा होणार आहे. या उत्सवाची सध्या संस्थानमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. उत्सवानिमित्त होणाऱ्या कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. साक्षात परब्रह्म असणारे देहत्यागानंतर समाधीरूपाने भक्तजनांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करणारे विरक्त संन्यासी म्हणजेच भक्तांचे लाडके भालचंद्र बाबा. अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांना भक्तजनांची माऊली म्हणूनही ओळखले जाते.
पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पहाटे ५.३० ते ७.३० वा. समाधीपूजन, काकडआरती, सकाळी ८.३० ते १२.३० वा. सर्वभक्त कल्याणार्थ धार्मिक विधी -भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दु. १२.३० ते १ वा. आरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, १ ते ४ वा. भजने, सायंकाळी ४ ते ७.३० वा. कीर्तन महोत्सव, रात्रौ ८ ते ८.१५ दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.
तर रविवार ८ डिसेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी दिन आहे. पहाटे ५.३० ते ८ वा.समाधीपूजन, काकडआरती, जपानुष्ठान, सकाळी ८ ते १०.३० वा. भजने, सकाळी १०.३० ते १२.३० वा. समाधीस्थानी मन्यूसूक्त पंचामृत अभिषेक, दु. १२.३० ते १ वा. आरती, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद, दु. १ ते ५ वा. भजने, सायंकाळी ५ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्यासमवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक व नंतर आरती तर रात्रौ ११ वा. दशावतारी नाटक पुण्यप्रभाव (भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल) असे कार्यक्रम होणार आहेत.
तरी या पुण्यतिथी महोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.