देवगड (प्रतिनिधी)
युथ फोरम- देवगड आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रमोद आर्वी (पुणे) प्रथम क्रमांक ; पहा रांगोळी प्रदर्शनातील उल्लेखनीय रांगोळी
युथ फोरम- देवगड यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत प्रमोद आर्वी (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. रोख १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात भरविण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत द्वितीय क्रमांकप्राप्त समीर चांदरकर (मालवण) यांना रोख १२ हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकप्राप्त सुरेश छत्रे (कोल्हापूर) यांना रोख १० हजार रू. व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकप्राप्त साईनाथ पारकर (मालवण) व केदार टेमकर (कुडाळ) यांना प्रत्येकी रोख ५ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण चारुदत्त सोमण व अक्षय शहापूरकर यांनी केले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी देवगड एज्युकेशन बोर्डाच्या स्थानीय समिती सदस्य अनुश्री पारकर, देवगड नागरी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या माणगावकर, भाजप युवामोर्चा देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, उद्योजक मधुकर नलावडे, मृत्यूंजय मुणगेकर, युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, सहसचिव ॲड. अपेक्षा सकपाळ, सौ. रसिका सारंग – आचारेकर, खजिनदार सागर गावकर, ओंकार सारंग, ॲड. सौ. श्रुती माणगावकर, चिन्मयी बिडये, चिन्मया ठाकुर, सागर अनभवणे, सौ. स्वीटी आचरेकर, आकाश सपकाळ, सुरज प्रभू, श्वेता महाडिक, गोविंद माळी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष होते. यावेळी संस्थेच्या देवगड- जामसंडे शहर अध्यक्षपदी गोविंद माळी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थाध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.
स्पर्धक कलाकारांनी रेखाटलेल्या आकर्षक रांगोळीच्या प्रदर्शनालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांसह सिंधुदुर्गातील मालवण, कुडाळ तसेच रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्हयातील शेकडो रांगोळी प्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनाला आमदार नीतेश राणे, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, लाईफलाईन फाऊंडेशनचे डॉ. सुनील आठवले, जिल्हा बँक माजी अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर, देवगड एज्यूकेशन बोर्डाचे स्थानिक कमिटी अध्यक्ष के. एन. बोरफळकर, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन संस्थेच्या उपक्रमाचे व रांगोळी कलाकारांचे विशेष कौतुक केले.






