सर्व्हीस रोडवरील खड्ड्यात पडून जिल्हा बँक अधिकारी यांचा मृत्यू ; हुंबरट येथील घटना : सुबोध कुडतरकर यांच्या निधनाने हळहळ
कणकवली दि १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील हुंबरट सर्व्हीस रोड वरील खड्ड्यात दुचाकीसह कोसळून जिल्हा बँक कणकवली शाखेत इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेले सुबोध तुकाराम कुडतरकर (वय ५०, रा. करुळ, मधलीवाडी ) यांचे अपघाती निधन झाले.
महामार्ग प्राधिकरण अशाप्रकारे जीवघेणे बनलेले खड्डे बुजवण्यास दिरंगाई करत आहे. गेले तीन महिने हुंबरट तिठ्याच्या अलीकडे सर्विस रस्त्याला पडलेला हा खड्डा जीवघेणा ठरत असताना देखील हा खड्डा बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यामुळेच दुचाकी खड्ड्यात जात सुबोध यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्थानिकांतून सांगण्यात आले.
सुबोध कुडतरकर हे काल (ता.१६) रात्री आठच्या सुमारास कणकवलीहून करूळ या गावी जात होते. पाऊस असल्याने हुंबरट सर्व्हीस रोडवरील खड्डा त्यांच्या निदर्शनास आला नाही. या खड्ड्यात दुचााकी गेल्याने ते रस्त्यावर कोसळले. यादरम्यान त्याच रस्त्यावरून कणकवलीतील म्हस्कर हॉस्पिटल कडील शेट्ये मेडिकलचे मालक श्री शेट्ये हे त्यांच्या पाठोपाठ करूळ गावी जात होते. त्यांनी जखमी कुडतरकर यांना आपल्या कारमधून तातडीने कणकवली येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सुबोध हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.





