कोकणात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार – खा.नारायण राणे 

96

कोकणात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार – खा.नारायण राणे 

कणकवलीत पत्रकारांशी नवनिर्वाचित खा.नारायण राणे यांनी साधला संवाद ; पत्रकारांनी पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

कणकवली(प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीतील रखडलेला महामार्ग , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न , विमानतळ प्रश्न , चिपळूण मधील सातत्याने निर्माण होणा-या पूरस्थितीबाबत लवकरच आढावा बैठक घेतली जाईल . दोन्ही जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी उपाययोजना केल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे धरणाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. कोकणात रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित खा.नारायण राणे यांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने नवनिर्वाचित खा.नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला . जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर,चंद्रशेखर तांबट, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, महेश सरनाईक, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, खजिनदार योगेश गोडवे, माजी अध्यक्ष भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, भास्कर रासम, वीरेंद्र चिंदरकर, स्वप्निल वरवडेकर, उमेश बुचडे, संजय बाणे, विराज गोसावी, दर्शन सावंत ,तुळशीदास कुडतरकर आदी पत्रकार उपस्थित होते.

कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसरात काही चांगल्या कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी जागा देण्याचा विचार आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी माझे प्रयत्न असतील असे श्री राणे म्हणाले.