देवगड जामसंडे शहराचा कचरा व पाण्याचा प्रश्न भाजप सोडविणार ; माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
देवगड (प्रतिनिधी)
शहराच्या समस्या सोडवण्यासाठी न. पं. मधील सत्ताधारी अपयशी ठरल्याने लोकसभा निवडणुकीत शहरातील जनतेने भाजपला मोठा मताधिक्क्याने मतदान केले आहे. त्यामुळे शहरातील समस्या सोडवण्याची जबाबदारी आता भाजपा पक्षाची आहे आमदार नितेश राणे व भाजप नगरसेवकांनी शहरातील कचरा व पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार दिवसात न. पं. आवारातील कचरा साफ करून परिसर स्वच्छ केला जाईल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे गटनेते शरद टूकरुल, भाजप देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्षा ऍड. सौ. प्रणाली माने, नगरसेविका सौ. तन्वी चांदोसकर, सौ. ऋचाली पाटकर, नगरसेवक विश्वामित्र खडपकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, बापू जुवाटकर, विजय कदम, दया पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चांदोसकर म्हणाले, देवगड जामसंडे नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांनी न. पं. च्या दारातच कचरा डम्पिंग केल्याने दुर्गंधीमुळे नगरपंचायतीतील कर्मचारी व येणाऱ्या ग्रामस्थांना नाक मोठी धरून राहावे लागत होते. दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ही समस्या सोडविण्यास सत्ताधारी उबाठा शिवसेना अपयशी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत देवगड व जामसंडे येथील जनतेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केले आहे. भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सर्वात जास्त मताधिक्य देवगड जामसंडे नगर पंचायतीमधून मिळाले आहे. त्यामुळे भाजपवर देवगड येथील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थकी लावला जाईल. देवगड व जामसंडे शहरातील समस्या सोडविण्याची व विकासाची जबाबदारी आमदार नीतेश राणे व भाजप नगरसेवकांनी उचलली आहे. उबाठा शिवसेनेकडे अडीज वर्षे सत्ता देऊनही शहराचा विकास करता आला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेला आता कितीही अपेक्षा राहिलेली नाही. सत्ताधाऱ्यांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे.
शहरातील कचरा प्रश्न येत्या तीन महिन्यात सोडविण्यात येईल. कचरा डंपिंग साठी जागा पाहिलेली आहे. प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर त्या जागेत कचरा डंपिंग व प्रकल्प राबविला जाईल.
सद्यस्थितीत कचरा डंपिंग करायला नगर पंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे मी माझ्या जागेत कचरा डंपिंग करण्याची परवानगी दिली आहे, असे चांदोसकर यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या आवारातील डंपिंग कचरा ओमटेक असोसिएट च्या माध्यमातून व भाजप च्यावतीने हटविण्यात येणार आहे.
देवगड नळयोजनेचा शासनाकडे गेलेला प्रस्ताव लवकरच मंजूर करून शहर वासीयांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही चांदोसकर म्हणाले.