बांदा (मंगल कामत) २३ मे २०२४
वादळी वाऱ्यामुळे दुचाकीवर कोसळले आब्यांचे झाड , पाच वाहनांवरदेखील कोसळले छप्पर, पाडलोस येथील घटना ; मडुरा पंचक्रोशीतील लाखोंचे नुकसान
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मडुरा पंचक्रोशीला झोडपले. पाडलोसमध्ये पाच वाहनांवर छप्पर तर एका वाहनावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले. तसेच न्हावेली, मडुरा, रोणापाल, कास, निगुडे, सातोसे, शेर्ले भागातही पडझड झाली. महावितरणचे सुमारे 10 विद्युत खांब व वाहिन्या कोसळून सर्वात जास्त नुकसान झाले. तर न्हावेली-रेवटेवाडी येथील स्ट्रीट लाईटवरही भले मोठे झाड कोसळले. वीजपुरवठा मात्र तत्काळ खंडित करण्यात आला.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी पुन्हा एकदा पाडलोस परिसराला जोरदार दणका दिला आहे. या वादळात काही घरांवर झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज सायंकाळी हजेरी लावत आहे. विजांचा कडकडाटसह पाऊस पडत असून जनजीवन विस्कळित होत आहे. गेल्या काही दिवसातील पावसामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणलाही दणका बसत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. उष्म्यामुळे नागरिकही हैराण होत आहेत.
पाडलोस-हवालदारवाडी येथेही रस्त्यावर झाडे पडली. मडुरा येथे वीज मीटरच्या बाजूला वीज पडल्याने नुकसान झाले. शेर्लेकरवाडी येथे वीज खांब तुटला होता. पाडलोस केणीवाडा येथील मुख्य वीज लाईनवरही झाडे कोसळली.तर वादळामुळे झाड पडुन दुचाकी चे नुकसान झाले.






