देवगड (प्रतिनिधी) १० मे २०२४
तळवडे झाजमतर खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू ; देवगड तालुक्यातील तळवडे येथील घटना
तीन जण होते बुडत होते, दोघांना वाचविण्यात आले यश
देवगड तालुक्यातील तळवडे झाजमतर खाडीत जयदीप पांडुरंग घाडी हा २३ वर्षीय युवक बुडून मयत झाला ही घटना गुरुवारी दुपारी ४:३० ते रात्री १२:३० च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळवडे घाडीवाडी येथील जयदीप पांडुरंग घाडी (वय २३ राहणार तळवडे घाडीवाडी)हा आपल्या चार मित्रासमवेत गुरुवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतुन पलीकडील वाणीवडे गावात पोहत जात होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तिघेजण बुडू लागले. बुडताना त्यांनी आरडाओरड केल्यामुळे खाडीकिनारी मच्छीमार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थानी बोटीच्या सहाय्याने यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील दोघांना वाचविण्यात यश आले मात्र जयदीप हा सापडला नसल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. रात्री साडेबाराच्या सुमारास झाजमतर किनाऱ्यालगत त्याचा मृतदेह तरंगताना दिसला याबाबतची फिर्याद जयदीपचे वडील पांडुरंग घाडी (वय ६०)यांनी देवगड पोलिसात दिली असून पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. देवगड पोलिसात याची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री महाडिक करीत आहेत.
जयदीप हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता तो गावात गवंडी काम करत असे . आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे .





