पियाळी येथे ऊस बागायतीला आग | लाखोंचे नुकसान

मागील नुकसानीची भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावीशी वाटत नाही | शेकऱ्यांतून नाराजीचा सूर

कणकवली : शेतकरी वर्ग आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या शेतजमिनीत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पीक घेत असतो. मात्र अशा पिकांना किंवा बागायतींना हिवाळा – उन्हाळा ऋतूत काही ना काही मार्गाने आग लागते आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं होऊन जातं. कणकवली तालुक्यातील पियाळी येथे भर दुपारी ऊस बागायती शेतीला आग लागली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्याने व वारा सुटल्याने आग सर्व माळरानापर्यंत भडकली होती.

दरवर्षी पियाळी येथे आग लागून ऊस बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या वर्षीही आग लागल्याने नुकसान झाले होते. वेळोवेळी पंचनामे केले. परंतु, अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावी वाटत नसल्याचे ऊस बागायत शेतकरी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांनी सांगितले.