नितेश राणे कोणत्या कारवाईला घाबरून भाजपात गेले..? वैभव नाईकांचा पत्रकार परिषदेत सवाल

…आणि सिंधुदुर्ग बदलतोय ही टॅगलाईन कशासाठी होती ?

कणकवली : आंगणेवाडी येथे झालेल्या भाजपच्या आनंद मेळाव्यानंतर सिंधुदुर्गात दोन्ही राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून आरोप – प्रत्यारोप होताना पाहायला मिळतायत. भाजपच्या आनंद मेळाव्यात तसेच सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धारेवर धरण्यात आले होते. मात्र कुडाळ – मालवणचे आम. वैभव नाईक यांनी कणकवली विजय भवन येथे पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांना जशास तसे उत्तर दिले.

दरम्यान आम. नाईक म्हणाले, राणेंना भाजप पक्ष वाढवण्यापेक्षा आपल्या दोन्ही मुलांना तिथे आमदार आणि मंत्री करायचे आहे. सिंधुदुर्ग बदलतोय ही टॅगलाईन कशासाठी होती ? असाही सवाल नाईक यांनी उपस्थित केला. हे बदलते भाजप म्हणण्यापेक्षा बदलत्या भाजपमध्ये फक्त राणेच बदलत आहेत. काही दिवसांनी कुडाळ – मालवणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. परंतु त्यांची डाळ ही जनता आता शिजू देणार नाही, असे आम. नाईक कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान बोलत होते.

सभेनंतर आम. नाईक यांनी कणकवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ठिकाणी राहीलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही राहणार. राणे महसूलमंत्री असताना ते काँग्रेसचे प्रचार प्रमुख होते. असे असताना आम्ही लोकप्रतिनिधी झालेलो आहोत. त्यामुळे अन्यायावर बोलण्यासाठी लोकांना आम्ही हवे आहोत. लोकांना आमचा आवाज हवा आहे. त्यामुळे हे आम्ही सातत्याने करत राहु असंही, आम. नाईक पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या मेळाव्यामध्ये मागील आठ वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा असे सांगितले. मात्र राणेंनी आठ वर्षात काहीच केलं नाही? हे त्या ठिकाणी सभेत भारतीय जनता पार्टीने व्यासपीठावर सांगितले. हेच राणे काँग्रेसमध्ये सोनिया गांधींचे बॅकलॉग भरण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी ते २४ – २४ तास काम करत होते आणि त्यांनी काँग्रेसला त्या ठिकाणी त्यांनी त्यांना घरी बसवण्याचे काम केले आणि आता पण त्यांनी २४ तास काम केलं तर मोदींना घरी बसण्याची भीती निर्माण होईल आणि त्याची शक्यता जास्त आहे. असंही नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगत राणेंवर टोला लगावला.

शिवसेनेमध्ये पहिल्या दिवसापासून राहणार असल्याचे देखील नाईक म्हणाले आणि म्हणूनच आपल्यावर आजपर्यंत अनेक कारवाया सुरू आहेत. परंतु आपण शिवसेना सोडणार नाही. आत्ता माझ्यावर ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. त्या पद्धतीने मला जाणीव होते की, माझ्यावर कारवाईच्या माध्यमातून पक्ष सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, नितेश राणे कोणत्या कारवाईला भिऊन भाजप पक्षात गेले ? नितेश राणेंनी माझी काळजी करू नये मी शिवसेने बरोबरच राहणार आहे, असे स्पष्टीकरण देखील आम. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

आंगणेवाडी येथे भारतीय जनता पार्टीने सभा घेतली.! ती सभा नेमकी कशासाठी घेतली ? एक तर त्या आनंद मेळाव्यामुळे आंगणेवाडी येथे आलेल्या भक्तांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होता ? की राणेंना या जिल्ह्यात राजकीय निरोप देण्यासाठी होती ? की आपण न केलेली कामे लोकांना सांगण्यासाठी होती ? असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना पडला आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून लोकांना त्रास देण्यासाठी सभा ठेवण्यात आली होती का ? असा सवालही आम. नाईक यांनी उपस्थित केला. प्रशासनाने या मेळाव्यासाठी परवानगी दिली होती. आमचाही या मेळाव्याला काही विरोध नव्हता. मात्र दोन दिवस लोकांनी आम्हाला सांगितले, पाच तास ट्राफिक मध्ये काढावे लागले. काही लोक दर्शन न घेता मागे गेले अशा खरपूस शब्दात आम. वैभव नाईक यांनी राणे आणि विरोधकांचा समाचार घेतला.