ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मतदानासाठी ३५ पथके कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक शाखेकडून नियोजन

17

ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मतदानासाठी ३५ पथके कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक शाखेकडून नियोजन

कणकवली ( प्रतिनिधी)दि १९ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील इच्छुक मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात ३५ पथके तयार करण्यात आली आहेत. यात ७५२ ज्येष्ठ नागरिक व १०१ दिव्यांग मतदार मिळून ८५३ मतदारांचे मतदान १ ते ४ में या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अगदीश कातकर

यांनी दिली.

कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघांत ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ४६९१ दिसत आहे. २०३८ मतदारांना मतदानासाठीच्या फॉर्मचे वाटप करण्यात आले होते, ७५२ जणांनी फॉर्म भरून दिलेले आहेत. तर २३८६ दिव्यांग मतदारांनाही फॉर्मचे वाटप करण्यात आले असून, त्यातील १०१ मतदारांचे मतदान घरी जाऊन
घेण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेण्यासाठी या मतदारसंघात ३४ पथके तैनात करण्यात आली आहेत, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, १ ते ४ मे या कालावधीत ही पथके संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहेत.

या पथकांत दोन मतदान अधिकारी, व्हिडीओग्राफर, पोलिस कर्मचारी, मायक्रो ऑब्झर्व्हर यांचा समावेश असणार आहे. मतदाराच्या घरी गेल्यानंतर आवश्यक खबरदारी घेऊन स्वतंत्र मतदान कंपार्टमेंट तयार करून मतदान घेण्यात येणार असून, ते लिफाफ्यात बंद करून पेटीत ठेवण्यात येणार आहे. या पथकांसाठी दिवसाला १० ते १७ मतदारांचे मतदान होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

१ ते ४ मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करून नंतर सीलबंद ट्रैक रत्नागिरीला पाठविण्यात येणार आहेत.