कणकवली नगरपंचायत करणार गडनदी पात्रातील गाळ उपसा ; मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली माहिती

20

कणकवली नगरपंचायत करणार गडनदी पात्रातील गाळ उपसा ; मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली माहिती

पाणीटंचाई त्रासापासून मुक्तता होणार

कणकवली दि १९ (तुळशीदास कुडतरकर)

कणकवली नगरपंचायतीची नळयोजना कार्यान्वित असून, दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस गडनदी पात्रातील पाणी कमी होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी कणकवली नगर पंचायतीने मे महिन्यामध्ये नदीतील गाळ उपसा करण्याचे नियोजन केले असून, सुमारे आठ ते दहा दिवसांनी नगर पंचायत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नदीपात्राची पाहणी करून स्थितीनुसार नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम हाती घेणार आहेत, अशी माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नदीतील गाळ उपसा केल्यामुळे नळपाणी योजनेच्या जॅकवेलजवळील नदीच्या कोंडीमध्ये पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ होऊन शहरातील नागरिकांचा पाणीटंचाईचा त्रास कमी होणार आहे. तसेच नगरपंचायतीतर्फे एप्रिल महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्गनगरी येथील लघु पाटबंधारे विभागाकडे शिवडाव धरणातील पाणी गडनदी पात्रात सोडण्याबाबतचे मागणीपत्र देण्यात येणार आहे. जेणेकरून लवकरात लवकर नदीपात्रात पाणी उपलब्ध होऊन मे महिन्याअखेरीस होणाऱ्या पाणीटंचाईच्या त्रासापासून कणकवली शहरातील नागरिकांची मुक्तता होणार आहे, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.