चुकीचा अहवाल देऊन प्रशासनची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करा – योगेश तांडेल यांची मागणी
वेगुर्ला (प्रतिनिधी)दि १६ एप्रिल २०२४
रस्त्याच्या कामाचा बोगस ट्राजेक्ट वॉक अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या उप अभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता द्वारकानाथ मेस्त्री त्यांची सकोल चौकशी करून त्यांचेवर विलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
योगेश तांडेल यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खानोली कोंडूरा ते येरम लिंगाचे देवालय या रस्त्याचा ट्रांजेक्ट वॉक अहवाल कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना सादर करताना तत्कालीन उप अभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता द्वारकानाथ मेस्त्री यांनी सदर रस्त्याची जागा कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करून संपादित न करता व सदर रस्त्याचा भुमिअभिलेख कडून शासकीय सर्वे न करता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या शासन निर्णयामध्ये घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन न करता शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून सादर केलेला आहे.
तसेच सदर क्षेत्र हे शासनाच्या सीआरझेड एक मध्ये समाविष्ट असताना सुद्धा सी आर झेड विभागाची देखील कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही या आणि अशा सर्व बाबी नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत या प्रस्तावावर ग्रामसेवक यांच्या असलेल्या सह्या देखील बोगस असल्याचे दिसून येत आहे तसेच अल्पवयीन मुलांची नावे घालून त्यांच्याही सह्या करण्यात आलेल्या आहेत.
या सर्व प्रकाराबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या जवळ माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज सादर करून सदर ट्राजेक वॉक अहवाल सादर करणाऱ्या जबाबदार व्यक्तींची माहिती मागितली असता त्यांनी अजित जनकू पाटील तत्कालीन उप अभियंता वेंगुर्ला व व्दारकानाथ शशिकांत मेस्त्री कनिष्ठ अभियंता वेंगुर्ला यांची नावे दिलेली आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या अहवालामुळे गेल्या पाच वर्षापासून प्रशासनाने विविध मार्गाने शासनाचा लाखो रुपये निधी वाया घालवलेला आहे त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या या कामाबाबत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता मला देखील आर्थिक ,मानसिक, शारीरिक त्रास सोसावा लागला आहे.
त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या उप अभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता द्वारकानाथ मेस्त्री यांची सखोल चौकशी करून त्यांचे वर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व त्यांच्यामुळे शासनाचा वाया जाणारा करोड रुपये निधी वाचविण्यात यावा असे म्हटले आहे.





