देवगड मध्ये ईस्टोर कंपनीकडून गुंतवणूक गुंतवणूकदारांची २६ लाख रुपये रकमेची फसवणूक ; चार संचालक व सात एजंटांवर गुन्हा दाखल

470

देवगड मध्ये ईस्टोर कंपनीकडून गुंतवणूक गुंतवणूकदारांची २६ लाख रुपये रकमेची फसवणूक ; चार संचालक व सात एजंटांवर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी)दि १४ एप्रिल २०२४

देवगड मध्ये ईस्टर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या कारवाईने देवगडमध्ये खळबळ उडाली आहे . ईस्टोर कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना भरघोस फायदा असल्याचा तसेच चांगला परताव्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम रोख स्वरूपात तसेच बँकिंगद्वारे गुंतवणूकदारांकडून घेऊन गुंतवणूकदार लोकांची सुमारे २६ लाख १४ हजार २१० रुपयाची आर्थिक फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना दिनांक १७ ऑक्टोंबर २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीत घडली. या घटनेने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील फैजान खान , शमशाद अहमद, गुरु द अली खान आणि मुकेश तेली यांनी ई-स्टोअर मधील वेदिक आयुरकेअर प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य एजंट म्हणून देविदास परब(देवगड तारामुंबरी) , अनिल जाधव(मुंबई), संजना परांजपे (पनवेल), शैलेंद्र पेडणेकर (सावंतवाडी), रौनक पटेल (कणकवली), सचिन सावंत (कुडाळ), किरण कदम (कुडाळ नारूर) या एजंट द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात तसेच देवगड येथे एका गाळ्यामध्ये मुख्य एजंट देविदास परब यांनी ई- स्टोअर मधील वेदिका आयुर केअर नावाचे कंपनीचे कार्यालय उघडून गुंतवणूकदार लोकांना ई-स्टोअर मधील वेदिका कंपनीची ग्रोसरी, हेल्थ फॅमिली पॅकेज, वेदा पॉईंट, वेदा माल्ट ,मल्टिपल फॅमिली पॅकेज या नावाच्या पॅकेजवर भरघोस परतावा व फायदा असल्याचे तसेच चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून त्याकरिता वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम रोख तसेच बँकिंगद्वारे गुंतवणूकदारांकडून स्वीकारून एकूण ५४ गुंतवणूकदारांना कंपनीचा आयडी नंबर देऊन त्यांनी दिलेल्या स्कीममधील आश्वासने प्रमाणे परतावा रक्कम मुदत संपून सुद्धा परत न करता त्या रक्कमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदार लोकांचा एकूण २६ लाख १४ हजार २१० रुपयेचा आर्थिक अपहार केला. तसेच ई-स्टोअर मधील वेदिक आयुरकेअरचे मुख्य संचालक व एजंट यांनी देवगड परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गुंतवणूकदार लोकांची अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करून रकमेचे अपहार केला आहे .

अशी तक्रार तारामुंबरी येथील चैतन्या चेतन तारकर (३१) यांनी दिली असून या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी या कंपनीचे मुख्य संचालक फैजान खान, शमशाद अहमद ,गुरु द अली खान,मुकेश तेली रा. दिल्ली व मुख्य एजंट ,अनिल काशीराम जाधव ,संजना परांजपे, शैलेंद्र पेडणेकर ,रौनक पाटील, सचिन सावंत, किरण कदम, देविदास परब यांच्याविरुद्ध ४२०,४०६, ४६५,४६७, ४६८,४७१,३४ प्रमाणे तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९-३ याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत.