भाजपामध्ये नारायण राणे यांची अवस्था ना घरका, ना घाटका टक्केवारीवर काम करीत नाही तर जनतेच्या हितासाठी काम केले खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रहार
देवगड (प्रतिनिधी)
नारायण राणे यांना भाजपाने त्यांचे योग्यता दाखवून दिली असून त्यांची अवस्था ना घरका, ना घाटका अशी केली आहे. अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला. आम्ही टक्केवारीवर काम करीत नाही तर जनतेच्या हितासाठी काम केले अशी टीकाही त्यांनी राणेवर केली. देवगड आनंदवाडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित खळा सभेत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला.
यावेळी शिवसेना उबाठा सेना जिल्हाप्रमुख , शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावरणे ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर,सौ जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सचिन सावंत, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी संतोष तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी, युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुरज घाडी, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंयडे ,बाळा मुणगेकर, नाना मुणगेकर, बाळू बांदकर आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार अर्ज १६ एप्रिल रोजी दाखल करणार असून १८ एप्रिल रोजी प्रचाराला सुरुवात करणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ११२ खळा बैठका घेण्याचा विक्रम केला असल्याचे राऊत यांनी सांगितले .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दुकलीचा कोकणातील जमिनी सिडकोच्या ताब्यात देण्याचा डाव आहे.मात्र आमचा त्याला विरोध असून कोकणाच्या मानगुटीवर सिडको प्राधिकरण लादण्याचा डाव हाणून पाडू असा इशारा खासदार राऊत यांनी दिला .सिडकोच्या माध्यमातून जमीन घेऊन परप्रतियांच्या घशात घालण्याचा डाव आहे.कोणत्याही परिस्थितीत सिडकोला येथे थारा देणार नाही असे राऊत यांनी यावेळी सांगितले.





