आंगणेवाडी : हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी मान्यता असणाऱ्या सिंधुदुर्गातील मालवण इथल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा म्हणजे महाराष्ट्राचा जणू पॉलिटिकल पावर हाऊस शो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांपासून जवळपास अर्धे कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षाचे सर्व मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार, यांच्या बंडानंतर यावर्षीची ही पहिलीच जत्रा. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन आमदार युतीचे आणि एक आमदार खासदार उद्धव ठाकरे गटाचे त्यामुळे सामना रंगणार हे निश्चितच होते. आमदार वैभव नाईक यांच्या होर्डिंगने वातावरण चांगलेच तंग झाले होते.
त्यात भरीत भर म्हणून संध्याकाळच्या वेळेला आयोजित केल्या गेलेल्या भव्य दिव्य अशा भाजपच्या सभेवेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बोलण्यास उभे राहिले आणि अचानक फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. देवेंद्र फडणवीस आणि आणि व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या प्रतिक्रियेत हे फटाके किमान भाजप कार्यकर्त्यांनी लावले नसावेत असेच चित्र दिसत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे या फटाक्यांचा आणि फटाके लावणाऱ्यांचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख देखील केला, आणि केवळ भाजपमध्ये आहे म्हणून संयमाची भूमिका घ्यावी लागते अशी चेतावणी देखील फटाके लावणाऱ्यांना दिली.




