कुणकेश्वर यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट ची कामे युद्ध पातळीवर सुरू
यावर्षी कुणकेश्वर महाशिवरात्रीला श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी ६ देवस्वाऱ्या येणार
देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे यांची पत्रकार परिषदेत माहिती
देवगड (प्रतिनिधी)दिनांक ४मार्च २०२४
श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा दि. ०८ मार्च २०२४ ते १० मार्च २०२४ रोजी मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. दिनांक १० मार्च २०२४ तिर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे. सदर वार रविवार अमावास्या यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये भव्य मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालिन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा नियोजनाच्या संदर्भात देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वर भक्तनिवास येथील ट्रस्टच्या कार्यालयात सोमवार 4 मार्च रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते.यावेळी देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार अभय पेडणेकर,सचिव शरद वाळके,संजय आचरेकर,विजय वाळके, रामदास तेजम, अजय नानेरकर आदी उपस्थित होते
अध्यक्ष पुढे म्हणाले,यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परीसर, यात्रा परिसरात आवश्यक त्याठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक
आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे.
त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबधित खात्याने आवश्यक ते कामकाज यात्रेपुर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही चालु आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दिच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी अमावस्या दिनांक १० मार्च रोजी असल्याने तिर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपुर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरूष व महिलांकरीता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे
पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत.
यात्रा परीसरामध्ये राजकिय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण होवू नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनर्सच्या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आले आहे.मान. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुणकेश्वर येथे ग्रामस्थ कुणकेश्वर व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेत यात्रा नियोजन बैठक पार पडली.त्यात प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करुन, उणीवा समजुन घेण्यात आल्या त्याच प्रमाणे संबधित शासकीय खात्याना अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात
आल्या त्यात प्रामुख्याने १. वहातुक व्यवस्था, २. रस्ते, ३. विद्युत व्यवस्था ४. आरोग्य व्यवस्था ५. पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, पार्कींग व्यवस्था ६. स्वयंसेवक ७.
पाणीपुरवठा यासर्व मुद्यांवर आढावा घेण्यात आला.
कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मिठमुंबरी तारामुंबरी मार्गे देवगड जाणारा जिल्हा प्रमुख मार्ग अजुनही खड्डेमय व असुरक्षित असल्यामुळे सर्व स्तरावरुन शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मिठमुंबरी समुद्र किनारी अस्मी हॉटेल येथे बॅरीकेट्स नाहीत.त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपुर्ण महाराष्ट्र व देशभरात होणार आहे. तसेच संपुर्ण यात्रा परीसरामध्ये एल्. ई. डी. स्क्रीन व्दारे प्रक्षेपण आहे.दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पहाता देवस्थान ट्रस्टने नियोजनात बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर यावर्षी उद्योजक श्री. किरण सामंत यांनी प्रथम पुजेसाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे देवस्थान ट्रस्टचे नियोजन चालु आहे. यादरम्यान भाविक भक्तांना दर्शनासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन केले जात आहे.
यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी श्री देवी भगवती देवस्थान – मुणगे देवगड, श्री देव बोंबाडेश्वर – पावणाई देवस्थान मठबुद्रुक – मालवण, श्री देव भैरवनाथ देवस्थान वरवडे – कणकवली, श्री माधवगिरी देवस्थान माईण कणकवली,श्री देव गांगेश्वर देवस्थान नारिंग्र देवगड, श्री देव बाणकीलिंग पावणाई देवस्थान हुंबरठ कणकवली या देवस्वाऱ्या येणार आहेत.
यावर्षी येणाऱ्या देवस्वाचा दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० ते रात्रौ ११:०० या कालावधीत श्री देव कुणकेश्वर भेटीकरीता येणार असल्याने सदरहू कालावधीत काहीवेळ दर्शन रांगा बंद राहतील तसेच प्रथम पुजेदरम्यान महाआरती नंतर पहाटे ०३:०० वाजता दर्शन रांगा चालु करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. यावर्षी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी बॅरिकेटींग व्यवस्था करण्यात आली असुन अपंग व वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग असणार आहे.भाविक भक्तांनी तसेच व्यापारी वर्गाने आणि सर्व यात्रेकरूंनी यात्रा कालावधीमध्ये
ग्रामपंचायत कुणकेश्वर व यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रशासकीय यंत्रणा यांना सहकार्य करुन प्रतीवर्षाप्रमाणे यात्रौत्सव सुरळीत पार पाडावा असे आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे यांनी दिली.





