राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही हेच भाजपचे अपयश :- वैभव नाईक

80

राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही हेच भाजपचे अपयश :- वैभव नाईक

सत्ताधारी मंत्र्यांमध्ये कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडे प्रचाराची धुरा

कणकवली‌ (प्रतिनिधी) ४ मार्च २०२४

महाविकास आघाडीचे उमेदवार खा.विनायक राऊत हे निश्चित झाले आहेत. पण या लोकसभेत शिंदे गट आणि भाजपला आमच्या विरोधात अद्यापही उमेदवार मिळत नाही, हे त्यांचे अपयश आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये कुवत नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत अतुल रावराणे, निलम पालव-सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पुढे बोलताना आम.वैभव नाईक म्हणाले की,शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात जनतेचे विविध विकासकामे मार्गी लावली. महामार्ग, चिपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज अशी कामे मार्गी लावली आहेत.

सर्व‌सामान्यांचे खासदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या मनातील खासदार म्हणून त्यांची सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ५ मार्चला बैठक होईल त्या बैठकीत त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणार आहे.असे नाईक म्हणाले.