कणकवली : मागिल काही दिवसांपासून जिल्ह्यात बस गाड्यांची बिकट परिस्थिती होत चालली आहे. कणकवली आगारात सर्व बस फेऱ्या सुरळीत करण्यासाठी ७० ते ८० बस गाड्यांची गरज आहे. असे असले तरी बस गाड्यांबाबतची गैरसोय अद्याप मिटलेली नाही. अलीकडे काही दिवसांपूर्वी आम. नितेश राणे यांनी एसटी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व एसटीच्या या मोठ्या समस्येबाबत काही समस्या निकाली काढल्या होत्या व उर्वरित समस्या आपण टप्प्याटप्प्याने निकाली काढू. तोपर्यंत शालेय बस फेऱ्या असतील त्या सुरळीत करा. शालेय मुलांचे येण्या – जाण्याचे हाल करू नका, असेही सांगितले होते.

मात्र सध्याची परिस्थिती पहिली तर कणकवली आगाराचे नियोजन हे कायमच नियोजन शून्य असल्याचे नेहेमी पाहायला मिळत. एखाद्या गावात बस गेल्या तर त्या पाठोपाठ जातात. जिथे नाही तिकडे एकही बस जात नाही. याचा उद्रेक काल कणकवली आगारात पाहायला मिळाला. रामगड, बेळणे, श्रावण, पळसंब, आचरा या गावच्या मुलांनी संतप्त होत कणकवली आगारातील चालत्या बस गाड्या एकत्र येत रोखल्या. संतप्त झालेल्या शाळकरी मुलांनी मार्गस्थ झालेली बस रोखली व आपल्या मार्गावरील विद्यार्थ्यांची व्यवस्था करून घेतली.
रामगड, बेळणे, श्रावण, पळसंब, आचरा या मार्गावर १० :०० वा, १२ वा. तळशील, १:३० वा. बांदिवडे, १:४५ वा. मालवण या बस गाड्या आहेत. मात्र या मार्गावरील काही गाड्या मध्ये मध्ये सोडत नाहीत त्यामुळे आम्ही संतप्त होत हा मार्ग अवलंबला असल्याचेही त्या शाळकरी मुलांनी सांगितले. आता तरी एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी काय भूमिका घेतात आणि नियोजन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी बस रोखताना शालेय विद्यार्थी साक्षी परब, आशिष हातले, ऐश्वर्या घाडीगावकर, साक्षी हर्णे, सुजाता हर्णे, अपेक्षा वरक, प्रतीक्षा चौकेकर, समृद्धी बाईत, बिपीन यादव, भक्ती सावंत, भारती सादये, रोशनी फर्नांडीस, नेहा हडकर यांच्यासह जेष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.





