नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई येथे साहित्य परिसंवाद आणि मराठी-मल्याळी कविसंमेलन उत्साहात संपन्न
मुंबई (प्रदीप बडदे)
रविवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई येथे मराठी-मल्याळी एथनिक फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सलग ३ दिवस विविध स्पर्धांचे, व कार्यक्रमांचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते. एथिनिक मराठी-मल्याळी काव्यसंमेलनाचे आयोजन प्रोफेसर/कर्नल डॉ.कवुंबई जनार्दनन यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले. विविध स्पर्धांसोबतच मार्गदर्शन, शिबिरे, विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, चित्रकला, नृत्य, संगीत-गायन अशा काही महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. सर्वच पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत भव्य अशा दालनात गेल्यावर डोळ्यात न मावणारी कामगिरी स्पष्टपणे नजरेसमोर उभी राहते. शासकीय आदेशांचे पालन करताना सर्वच स्पर्धक, दर्शक, विद्यार्थी, पालक तसेच रसिक प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
कविसंमेलनात अनेक मान्यवरांनी आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले. गझल, गीत, मुक्तक, छंदोबद्ध, मुक्तछंद, पोवाडा अशा विविध काव्यप्रकारात अर्थपूर्ण व बहारदार शब्दांनी रचना सादर झाल्या. कविसंमेलनाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या मा.अनुराधा नेरूरकर यांनी मराठी साहित्याला एक वेगळी कलाटणी देऊन सर्वसूत्री मराठी लेखक/ कवींचा थोडक्यात परिचय करून दिला. संमेलनाचे सूत्रसंचालन कवी श्री.अरुण दत्ताराम म्हात्रे यांनी उत्तम प्रकारे केले तसेच कवयित्री फरजाना डांगे यांची उत्कृष्ट स्वरबद्ध साथ निवेदनात लाभली.
कवी संमेलनाकरीता विविध भागातून कवी-कवयित्रींनी प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. उरण, पनवेल, कर्जत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुरबाड, पालघर अशा विविध जिल्हा-तालुक्यातून कवी कवयित्रींनी हजेरी लावली होती. शबाना मुल्ला, पाकीजा अत्तार, प्रतिभा कुलकर्णी, पुष्पा कोल्हे, प्रदीप बडदे, जयेश मोरे, स्वाती शिवशरण, जयश्री भिसे, जयराम कराळे, रामनाथ म्हात्रे, घनश्याम परकाळे, स्नेहा फदाले, योगिता जाधव, सविता काळे, अंजना कर्णिक, देवदास नाडकर्णी, रिता जाधव, डॉ.अलका नाईक, उज्वला लुकतुके, कवयित्री सम्राज्ञी, शुभम पाटील, समीर बने, मनोज धुरंधर, मृणाल कुलकर्णी, मकरंद वांगणीकर, निर्मला देऊसकर अशा एकूण ४० कवी-कवयित्रींनी सहभागी होऊन कार्यक्रमाला शोभा आणली.
सदर कार्यक्रमाचे आयोजक प्रोफेसर/कर्नल डॉ.कवुंबई जनार्दनन यांनी सर्व कवी/ कवयित्री तसेच रसिकप्रेक्षकांचे आभार मानले, प्रशस्तीपत्र देऊन सर्व साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून हा सोहळा सातत्याने होत असून अशा सुंदर व नयनरम्य कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी होणार असल्याचे अध्यक्षांनी महोत्सवात आवाहन केले.





