मालवण देऊळवाडा येथे भरधाव डंपरच्या धडकेत विजय नाईक यांचा मृत्यू
मालवण शहर देऊळवाडा येथील घटना : डंपर चालक नशेत : नागरिकांच्या संतापाचा उद्रेक
मालवण (प्रतिनिधी)
मालवण देऊळवाडा येथे भरधाव डंपरच्या धडकेत देऊळवाडा येथील विजय वसंत नाईक (५३) मूळ रा. पोईप यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डंपर रोखला. डंपर चालक हा नशेत असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिक अधिकच संतप्त बनले. वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब व कर्मचारी घटस्थळी दाखल झाले. डंपर चालक याला ताब्यात घेण्यात आले. डंपर मालकही दाखल झाला. त्याच्या विरोधातही नागरिक संतप्त बनले होते.
देऊळवाडा मार्गांवरून येथून हडी मार्गांवर हा नंबर नसलेला डंपर जात होता. तर विजय नाईक हे आपले काम पूर्ण करून घरी जात होते. देऊळवाडा याठिकाणी डंपरची धडक नाईक यांना बसली आणि ते रस्त्यावर कोसळले. पोटाच्या भागाकडे डंपरचे चाक लागल्याच्या खुणा दिसून येत होत्या. तसेच डोकीलाही दुखापत झाल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत डंपर चालकाला थांबवून धरले होते. विजय नाईक यांना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप पळसंबकर यांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात नागरिकांनी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, उमेश चव्हाण तसेच अन्य नागरींक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
विजय नाईक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. कामानिमित्ताने हे कुटुंब मालवण देऊळवाडा याठिकाणी भाड्याने राहत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात वाळू वाहतुक करणारे डंपरही मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पाहून नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत डंपर वाहतूक बंद करण्याची मागणी केली. तसेच रस्त्यावरील डंपर वाहतूकही काही काळ रोखून धरली होती. भरघाव डंपरवर कारवाई होत नसल्याने अपघात होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. नारिकांनी व्यक्त केलेला संताप अगदी योग्य असल्याचे बोलले जात होते. नाईक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते, अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.





