मालवण (प्रतिनिधी)
आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग समाजाच्या विकासासाठी, व्यक्तींच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते -प्रा. डॉ. कुणाल जाधव
मुंबई विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत पर्यावरण संरक्षण जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे, समाजातील जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी उपक्रम राबविणे, अन्न वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येते. ज्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून समाजाप्रती असलेल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. असे प्रतिपादन नॅक मूल्यांकन समिती अध्यक्ष व मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे अधिकारी प्रा. डॉ. कुणाल जाधव यांनी कट्टा महाविद्यालयातर्फे आयोजित आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रथम सत्र मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या मार्गदर्शनाखाली कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रथम सत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. कुणाल जाधव यांच्या शुभहस्ते व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे संचालक महेश वाईरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य हेमंत माळकर, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे अधिकारी डॉ. सचिन राऊत, डॉ. शुभम सोनवणे, श्री किरण पाटील, श्री आलोक बच्चाव, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य प्रा रविंद्र गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उडान महोत्सव कार्यक्रमांतर्गत पथनाट्य स्पर्धा , वकृत्व स्पर्धा, सर्जनशील लेखन, पोवाडा गायन यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते असे मनोगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र गावडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून केले.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष व कट्टा संस्था संचालक महेश वाईरकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. कुणाल जाधव यांची नॅक मूल्यांकन समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, संस्था वर्षिकांक व संस्था सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. डॉ. कुणाल जाधव यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधताना नॅक मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण पद्धतीने कोणते सामाजिक उपक्रम, कश्या पद्धतीने राबविले पाहिजेत.त्यांचे मूल्यमापन कसे केले जाते. तसेच नॅक मूल्यांकन प्रक्रियेला महाविद्यालयाने सामोरे जाताना राबविलेल्या विविध उपक्रमांच्या अहवालांचे प्रभावी सादरीकरण कसे असावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रत्येक महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले.
तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर कला क्रिडा, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते अशाप्रकारचे मनोगत कट्टा महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य हेमंत माळकर यांनी व्यक्त केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी विद्यापीठातील ज्ञान व कौशल्य समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग निरंतर करत आहे अशा प्रकारचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
सदर कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्हा क्षेत्र सत्र समन्वयक प्राचार्य यशोधन गवस,प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. महेंद्र ठाकूर, प्रा. उमेश परब, प्रा. डॉ. सी. डी. भेंकी, सिंधुदुर्ग जिल्हा नॅक समन्वयक प्रा. आर. बी. शिंत्रे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध २८ महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समन्वयक, प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा वैशाली पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग सहाय्यक श्री. प्रतीक लोके यांनी केले.





