मागणी नसताना देवगड बोरिवली गाडी व्हाया कशासाठी केली, भाजपाचे देवगड एस.टी.आगाराला निवेदन
देवगड (स्वप्नील लोके) दि. ४ फेब्रुवारी
देवगड बोरिवली गाडी मागणी नसताना व्हाया बोहरा कॉलनी केली. यावर देवगड तालुका भाजपाच्या वतीने स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांना निवेदन देऊन ही बस फेरी पूर्ववत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,रा.प. देवगड आगारातील बोरीवली देवगड ही फेरी कित्येक वर्षे चालु आहे. या फेरीच्या मार्गात बदल करून व्हाया बोहरा कॉलनी अशी करण्यात आली आहे. सुमारे १८ किमी. वाढ होत असल्याने बोहरा कॉलनी येथे जात असताना प्रचंड वाहतूक असल्याने सदरची फेरी सुमारे १ ते १.३० तास उशीर होत आहे. त्यामुळे देवगड परिसरातील मोर्वे पालये, मिठबांव व अन्य गावातील प्रवाशांना सकाळच्या गाडया मिळत नाहीत. व त्यांना अन्य खासगी वाहनाने प्रवास करावा लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. देवगड तालुक्यातील कोणत्याही लोक प्रतिनिधी अथवा प्रवाशांनी सदरची व्हाया बोहरा कॉलनीची मागणी नसताना मार्गात बदल करण्यात आलेल्या बदल त्वरीत रद्द करून बोरीवली देवगड फेरी पूर्ववत करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल यांची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, देवगड जामसंडे नगरपंचायतीतील भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल भाजपा पदाधिकारी योगेश पाटकर, दयानंद पाटील व अन्य उपस्थित होते.





