मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बर्वे ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन

89

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बर्वे ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ग्रंथालयाला देणगीद्वारे मिळालेल्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन देवगडचे व्यापारी श्रीपाद अनंत कुळकर्णी यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी कुळकर्णी यांनी आजची पीढी मोठया प्रमाणावर मोबाईलच्या आहारी गेली आहे. साहजिकच पुस्तकांपासून दूर गेली आहेत. आजच्या समाज माध्यमांवर इंग्रजी भाषेचा प्रभाव दिसून येत असला तरी आपली मराठी भाषा आपण जपली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषेतूनच ज्ञान दिले पाहिजे. ग्रंथालयांनी जास्तीत जास्त मराठी भाषेतील साहित्य नवीन पीढी पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त मराठी भाषा संवादातून, संभाषातून, अभ्यासातून, वाचनातून, लिखाणातून तिचे संवर्धन व्हावे यासाठी शाळा,महाविद्यालयांनी आणि ग्रंथालयांनी असे उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. असेही कुलकर्णी म्हणाले.

मराठीचे स्थान जगातल्या प्रमुख भाषांमध्ये आहे. मराठी भाषा बोलतांना त्यावर इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो. मराठीतून बोलतांना मराठीतलेच शब्द वापरावेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा शुद्धी करण्यास प्रयत्न केले. त्यांनी अनेक प्रतीशब्द म्हणूनच साहित्य, मराठीतून बनविले. त्याचा उपयोग आजही शासन दरबारी केला जातो. मराठी भाषा समृद्ध आहे.नाटक चित्रपट, संगीत यासारख्या प्रभावी माध्यमाद्वारे सर्वदूर पोहोचू शकली. असे यावेळी पत्रकार श्री संतोष कुळकर्णी यांनी सागितले तर श्री श्रीपाद कुळकर्णी यांनी त्यांचे वडिल कै. अनंत ज. कुळकर्णी यांच्या जीवनप्रवासावर संपादित केलेले ‘जीवनयात्री एक अनंत प्रवास’ हे पुस्तक ग्रंथालयाला भेट दिले. तसेच वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी रू. ५०००/- ची देणगी दिली. अध्यक्ष श्री कर्णिक यांनी देणगीची रक्कम स्विकारून त्यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले .
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सागर कर्णिक यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सचिव श्री दत्तात्रय जोशी आणि संचालक सदस्य श्री नारायण गोगटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कर्णिक यांनी मान्यवरांचे व उपस्थित सर्व वाचकांचे आभार व्यक्त केले. आणि ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ग्रंथालयाचे कार्यकारी सदस्य श्री सीतराम पाटील, श्री. रमेश पवार, श्री. कदम तसेच ग्रंथालयाचे वाचकवर्ग उपस्थित होते.