३ लाखाचे दागिने चोरीस; तुळजापूर देवगड गाडीतील प्रवासादरम्यान प्रकार

186

तुळजापूर देवगड गाडीत महिलेच्या बॅगेतील सुमारे ३ लाखाचे दागिने लंपास

देवगड (प्रतिनिधी)

सांगली येथे गावाकडील लग्न समारंभ आटपून देवगडला परतताना एसटी प्रवासात ३ लाखाचे दागिने चोरीस झाल्याची घटना घडली असून हा प्रकार दोन दिवसांनी निदर्शनास आला. संबंधित महिलेने देवगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवगड कॉलेज रोड येथील शिवजयंती कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या सौ सुप्रिशा अविनाश गुंजाटे या महिलेचे प्रवासादरम्यान दागिने चोरीस गेले आहेत. ही घटना ९ जानेवारी रोजी तुळजापूर देवगड एसटीमध्ये प्रवास करताना घडली.सौ सुप्रिशा अविनाश गुंजाटे (२८) राहणार मूळ समडोळी जिल्हा सांगली या पती अविनाश गुंजाटे सासू संगीता पराग गुंजाटे मुलगा अद्विक यांच्यासह ५ जानेवारीला दिराचे लग्न असल्यामुळे गावी समडोळी येथे गेल्या होत्या. लग्न समारंभ आटोपूण दिनांक ९ जानेवारी रोजी सासू व मुलगा यांच्या सहित गावाकडून देवगडकडे येण्यास निघाल्या. येताना त्यांनी लग्न समारंभात घालण्यासाठी नेलेले सर्व दागिने जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅग मध्ये ठेवून सांगली एसटी स्टँड येथे आल्या. त्यानंतर सांगली येथून सासू मुलगा यांच्यासह दुपारी १ वाजता तुळजापूर देवगड या गाडीने देवगड येथे येण्यासाठी निघाल्या. यावेळी दागिने ठेवलेली जांभळ्या रंगाची प्रवासी बँग त्यांच्याजवळ होती. ती बॅग बंद स्थितीत सुशिक्षित असल्याची खात्री करून त्यांनी घेतली. सुरुवातीला गाडीत गर्दी असल्याने कोल्हापूरपर्यंत त्यांनी उभे राहूनच प्रवास केला. त्यानंतर ती बॅग त्या उभ्या असलेल्या ठिकाणापासून दोन सीट पुढे ठेवण्यात आली होती. गाडी कोल्हापूर येथे आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी जागा भेटली त्यावेळी त्यांनी ती बॅग आपल्याकडे ठेवली. गाडी गगनबावडा एसटी स्टँड येथे १० मिनिटांकरिता थांबली त्यावेळी फ्रेश होण्याकरिता गाडीतून खाली उतरल्या. तत्पूर्वी जांभळ्या रंगाची प्रवासी बॅग गाडीच्या सीट खाली ठेवून नंतर त्या खाली उतरल्या. पुन्हा गाडीत आल्यानंतर स्वीटच्या खाली असलेली बॅग बघितली. गाडी रात्री ८.१५ वाजता देवगड आली त्यानंतर गाडीतून उतरून रिक्षाने राहत असलेल्या शिवज्योती कॉम्प्लेक्स येथे आल्या. घरी आल्यानंतर थकून आल्यामुळे त्यांनी बॅग उघडून बघितली नाही. ती बॅग गुरुवार दिनांक ११ जानेवारी रोजी १२ वाजण्याच्या सुमारास पूजा करायची असल्याने उघडून पाहिली असता त्यावेळी बॅगेत ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे घंटन,साठ हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, पन्नास हजार रुपये किमतीचा सोन्याचा पावणेतीन तोळ्याच्या लक्ष्मी हार , वीस हजाररुपये किमतीचा सोन्याचा राणीहार,पंचवीस हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन, चार हजार रुपये किमतीचा चांदीचा छल्ला, चौदा हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, दहा हजार रुपये किमतीची पाच ग्राम वजनाची कानातील सोन्याची साखळी, असा एकूण तीन लाख आठ हजार किमतीचा व मिळाला नाही. याबाबत सौ गुंजाटे यांनी देवगड पोलीसांत तक्रार दिली असून देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत आहेत.