मारहाण करून रक्तबंबाळ केल्याप्रकरणी तसेच शेजाऱ्यांच्या घराचा दरवाजा फोडल्या प्रकरणी संशयित युवकावर गुन्हा दाखल ; देवगड तालुक्यातील घटना
देवगड (प्रतिनिधी)
वडील व काकीला वरवंटा घेऊन मारहाण करीत असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या काकीला वाचून घरी घेऊन गेलेल्या गवाणे तांबळवाडी येथील सौ जान्हवी राणे यांच्या घराचा दरवाजा फोडल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथीलच प्रतीक विजय मेस्त्री (२६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली
गवाणे तांबळवाडी येथील प्रतीक विजय मेस्त्री यांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमालास वडील विजय मेस्त्री यांच्या डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले होते. त्यावेळी त्यांना सोडविण्यासाठी काकी आशा मोहन मेस्त्री धावून गेली. परंतु प्रतिक याने रागाबरोबर तिच्या डोक्यावर वरवंटा मारला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या जान्हवी रवींद्र राणे यांनी त्या ठिकाणी जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत असलेला आशा मेस्त्री यांना तात्काळ आपल्या घरी नेले व घराचा दरवाजा बंद करून घेतला . हे पाहून प्रतीक यांनी त्यांच्या घरी जाऊन बंद असलेला दरवाजा फोडला ही घटना सौ जान्हवी राणे यांनी तरळे बाजारपेठेत गेलेले आपले पती रवींद्र लहू राणे यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब याबाबत देवगड पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी वडील व काकी यांना मारहाण करून जखमी करून तसेच शेजारी राहणारे रवींद्र राणे यांच्या घराचा दरवाजा फोडल्या प्रकरणी प्रतीक यांच्याविरुद्ध भादवी कलम 324, 527, 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष कदम करीत आहेत





