सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा मासिक अडतिसावा कार्यक्रम अभिवाचनाने पार पडला. यात मान्यवर साहित्यिकांच्या साहित्याचे अभिवाचन करणेत आले. सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाच शालेय विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले.
खुशी परब हिने प्रमोद नवलकर यांच्या ‘खादाड’ या कथेचे वाचन केले, तर सानिया शेख हिने शिल्पा तांबे यांच्या ‘सुमन, उठ माझी माय’ या कथेचे वाचन केले. साक्षी सुतार हिने राजीव तांबे यांची ‘फणस’ ही कथा, तर हर्षा पांचाळ हिने फारूख काझी यांची ‘कर के देखो’ ही कथा वाचली. शेवटी संचित पाढरे याने इसापनीतीतील एका गोष्टीचे वाचन केले.
साहित्य कट्ट्याच्या सदस्य स्नेहा नारींगणेकर यांनी व.पु.काळे यांच्या ‘गुलमोहर’ या कथेचे अभिवाचन केले. विनय सौदागर यांनी सादर केलेल्या व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘वावटळ’ या कादंबरीतील उताऱ्यांच्या अभिवाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास डाॅ. सुधाकर ठाकूर, विनायक उमर्ये, एकनाथ शेटकर, सरोज रेडकर, सोमा गावडे, अरुण धर्णे, दिया सावंत, प्रज्वल नारींगणेकर, मीरा ठाकूर, मृणाल ठाकूर, शुभंकर ठाकूर आणि अनिता सौदागर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज आजगावात साहित्य कट्ट्याचा अभिवाचन कार्यक्रम संपन्न.! ; ३८ व्या कार्यक्रमांत शालेय विद्यार्थ्यांनी...





