कुडाळ : माणगाव कट्टावाडी येथील चंद्रशेखर उर्फ योगेश जयराम केसरकर (वय-३६ ) यांचे आज सकाळी ९ वाजता आकस्मिक निधन झाले. कोलगाव येथील चितारी हॉस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री दहा वाजता त्यांची तब्येत अचानक खालावल्याने कोलगाव येथील डॉ. चितारी यांच्या दवाखान्यात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांची तब्येत अचानक खालवली यात त्यांचे निधन झाले.
काहीकाळ त्यांनी माणगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा बजावली होती. यानंतर कनेडी येथे कोल्ड्रिंकचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, काकी, विवाहित बहीण, वहिनी, पुतणे, भावोजी असा मोठा परिवार आहे. माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश केसरकर, हॉटेल व्यावसायिक समीर केसरकर यांचे ते भाऊ तर कनेडी येथील हॉटेल व्यावसायिक वल्लभ भोगटे यांचे ते मेहुणे होत.
तसेच ज्येष्ठ पत्रकार भरत केसरकर यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.
योगेश यांचे एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून दशक्रोशीत परिचय होता. आज दुपारी दोन वाजता माणगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी योगेश यांच्या मित्र – परिवाराने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने केसरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माणगावमधील दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



