कोलकाता : सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुप घोषाल हे अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. अनुप यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक चाहते आणि सेलेब्स गायकाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. माहितीनुसार, अनुप घोषाल हे वयोमानाशी संबंधित आजारांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 1.40 वाजता त्यांचे निधन झाले.
ममता बॅनर्जी यांनी वाहिली श्रद्धांजली –
अभिनेत्री पाओली डॅमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनुप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. घोषाल यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमधील गाण्यांचे गायन केलेल्या अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करते.” अनुप घोषाल यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अनुप यांनी संगीत क्षेत्रात विशेष स्थान मिळवलं होतं, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा मतदारसंघातून 2011 ची विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.





