‘तुमी येतालास म्हणान..!’ काव्याचे सोशल मीडियावर धुमशान.! ; कवयित्री अनुराधा आचरेकर यांच्या विडंबणात्मक काव्याने वेधले लक्ष.

615

मालवण : आज नौसेना दिन. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह देशातील आणि राज्यभरातील अनेक मंत्री मालवण शहरात येत आहेत. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या दिड महिन्यापासून प्रशासनाने दक्ष राहून मालवण शहरातील आणि परिसरातील रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. तसेच विविध परिसर सुशोभनीय असा केला आहे. कधी नव्हे एवढे सुंदर स्वरूप मालवण शहराला प्राप्त झाले आहे. मात्र त्यानिमित्ताने सोशल मीडियावर चांगलेच धुमशान सुरू असून आचरा येथील प्रतिभावंत कवयित्री सौ. अनुराधा यांची ‘तुम्ही येतालास म्हणान..! ‘ ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून या कवितेतून कवयित्री सौ. अनुराधा आचरेकर यांनी विडंबणात्मक काव्याने काव्य रसिकांचे आणि सामान्य जनतेचेही चांगलेच मनोरंजन केले आहे.

🤪तुमी येतालास म्हणान🤪

तुमी येतालास म्हणान…
रस्ते गुळगुळीत केले.
रोज चलणारे मुंगळे…
पाय घसरान मेले.

रान मारून शाप झाला…
घळणीसुदा गायब झाले.
खड्डयांचा काय इचारतास…
भोकशेव आता बुजान गेले.

भटाकणारी कुत्री,ढोरा…
गाडयेत भरून नेल्यानी.
कसलोच स्पीडब्रेकर नाय…
तुमची वाट मोकळी केल्यानी.

नायतर दरवर्षी खड्यांका…
ठिगळा मारून शिवतत.
पावसात शिलाय इसावता…
तेच्यात माशेसुदा रवतत.

कुत्रे, ढोरा आडवी येव्न…
गाडयेवाले पडतत.
हात पाय मोडता कोणचो..
कोण बिचारे जाग्यार मरतत.

गचके देय्त जाता जाता…
मणके बिनके सराकतत.
पॉरकरनी पाठी बसाक…
म्हाय्तहा किती टराकतत?

म्हणान एक इनंती तुमका..
आमच्याव गावात फेरी मारा.
वर्सान येक इरडीभर येवा..
हयसरव व्हावात सुधारणेचा वारा.

  • – सौ.अनुराधा अनिरुध्द आचरेकर.
    आचरा.(8788438690)
    ता-मालवण.
    जि.सिंधुदुर्ग.