सावंतवाडी पोलिसांची माहिती | मृतदेह टाकताना दरीत दुसरा कोसळल्याचे म्हणणे…
सावंतवाडी : आर्थिक देवघेवीच्या वादानंतर पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचे अपहरण करून कराड येथे घातपात करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी आंबोली घाटातील दरीत टाकण्याचा प्लान रचण्यात आला. परंतू प्लास्टिक पिशवीत असलेला मृतदेह खाली टाकताना तोल जावून भाऊसो माने हा घाटात कोसळला, अशी कबुली या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित तुषार पवार यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करीत आहोत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
हा सर्व प्रकार आर्थिक देवघेवीच्या वादातून झाला. पंढरपूर येथे मुकादम म्हणून काम करणा-या सुशांत खिल्लारे यांच्याकडून वीट भट्टीवर काम करण्यासाठी कामगार मागण्यात आले होते. त्यासाठी त्याला तीन लाख रूपये देण्यात आले होते. परंतु पैसे घेतल्यानंतर खिल्लारे याने कामगार दिले नाही. तसेच पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे प्लान करून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दारू पिऊन त्याचा घातपात करण्यात आला. तत्पूर्वी त्याला दहा दिवस नजर कैदेत ठेवण्यात आले होते, असेही तपासात उघड झाल्याचे बगाटे यांनी सांगितले.
याबाबतची माहिती श्री. बगाटे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित तुषार पवार व भाऊसो माने हे दोघे मित्र आहेत. कराड येथे शेतीचा व्यवसाय आहे. त्यांनी नवीन वीट भट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या ठिकाणी कामगार हवे असल्यामुळे त्यांनी पंढरपूर येथील सुशांत खिल्लारे याला तीन लाख रुपये देऊन कामगार देण्यास सांगितले होते. परंतु सुशांत याने कामगार न देता त्यांना उडवाउडुची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे १९ तारखेला माने याने खिल्लारे याला अपहरण करून कराड येथे आणले व नजर कैदेत ठेवले. त्यानंतर त्याला विचारणा करण्यासाठी त्यांनी खिल्लारे याला दारू पिण्यास आपल्या घरासमोर असलेल्या शेतात नेले. यावेळी विचारणा करीत असताना तिघात वाद झाले. यावेळी दोघांनीही त्याला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत खिल्लारे याचा मृत्यू झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, असावा असा संशय आहे.
दरम्यान अचानक तो मृत्यूमुखी पडल्याने दोघेजण घाबरले. यावेळी मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. यावेळी पवार यांनी आपण माझ्या टोयोटा कारमधून मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकू, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी प्लान आखला. त्यानुसार ते काल दोघेजण आंबोलीच्या दिशेने आले. त्यानंतर काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्लास्टिक पिशवीत असलेला मृतदेह दरीत टाकत असताना माने याचा पाय निसटला व तो मृतदेहासह खोल दरीत कोसळला अचानक हा प्रकार झाल्यानंतर पवार घाबरला.
मात्र काय करावे ? हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला. मात्र रात्र असताना सुध्दा त्याने त्याच ठिकाणी घाटात राहणे पसंत केले व सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कराड येथील आपल्या मित्राला अशाप्रकारे घटना घडली आहे, त्यामुळे तुम्ही या अशी माहिती दिली. यावेळी मित्रांच्या नातेवाईकांनी खिल्लारे व माने यांच्या घरातील लोकांना कल्पना दिली. त्यानंतर माने यांच्या कुटुंबीयांनी ११२ फोनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर त्या ठिकाणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले शोधा शोध घेत असताना बाजूच्या स्टॉलवर पवार हा बसलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला विचारणा केली असता हा प्रकार रात्री घडला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बसून होतो रात्री याच ठिकाणी झोपलो, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, गणेश कराडकर, सुरज पाटील यांच्यासह आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई, दीपक शिंदे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. खोलदरीत उतरून आंबोली येथील युवकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान याबाबतची माहिती श्री. बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राथमिक अवस्थेत ही माहिती उघड झाली आहे. आमचा तपास सुरू आहे अद्याप पर्यंत नेमके काय झाले हे कळू शकलेले नाही.




