“संघर्ष करु अन् धैर्याने पुढे जाऊ.!” ; शरद पवारांची पुन्हा पावसात बॅटिंग.

34

नवी मुंबई: नवी मुंबईत नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे स्वागत समारंभ थांबवून कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती शरद पवार यांनी केली. यावेळी शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले. शरद पवार म्हणाले, “आज अनेक महिलांनी अनेक चांगले स्टॉल उभे केले. मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली. माझ्या एक सांगणे आहे. निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये. निराशेवर मात करु, संघर्ष करु अन् धैर्याने पुढे जाऊ. हा निर्धार आज आपण करुया.”

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार मित्र श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शरद पवार साताऱ्यात असताना प्रचाराच्या भाषणावेळी धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली होती. यावेळी शरद पवार यांचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.