आजगावच्या गोगटे गुरुजी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम.!; मुलांना दिवाळी अंक दिला भेट.

65
  1. सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे मुलांना किशोर दिवाळी अंक भेट देण्यात आले. दिवाळी अंक वाचनाची महाराष्ट्रीय परंपरा जतन करणेच्या उद्देशाने दीपावली उत्सवाच्या पहिल्या दिवशी एका छोटेखानी कार्यक्रमात एकूण पंचवीस मुलांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांना पद्मगंधा, कालनिर्णय, जडणघडण, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मनःशक्ति, लोकप्रभा, किस्त्रीम, ग्रहसंकेत असे पंधरा दिवाळी अंक चाळण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य बबन आडारकर यांचे हस्ते उपस्थित प्रत्येक मुलाला किशोर दिवाळी अंक भेट देण्यात आला. दिवाळी अंक वाचना संदर्भात प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर यांनी मार्गदर्शन केले. हा किशोर अंक वाचून मुले त्यातील आवडलेल्या भागावर लिखाण करणार आहेत. दिवाळी सुट्टीनंतर या लिखित परीक्षण लेखातून उत्तम तीन लेख निवडून त्या मुलांना ‘साधना, गोट्या व कुल्फी’ हे अंक पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. मुलांसाठीचे सर्व अंक प्रतिष्ठानच्या माधुरी काकतकर यांनी पुरस्कृत केले होते.

या नंतर पारंपरिक बुद्धिवर्धक खेळ घेण्यात आले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. या अनोख्या उपक्रमात खुशी परब, सानिया शेख, हर्षा पांचाळ, आर्य काकतकर, प्रभाकर मोरजकर, गंधार गवंडे, वैभव पांढरे, तन्वी परब, स्वरा मोरजकर, मानसी पांचाळ, वैष्णवी मुळीक ,जान्हवी मुळीक, साक्षी सुतार, गणेश खोबरेकर, विष्णू कळसुलकर, उत्कर्ष पांढरे, दिया सावंत, आयान शेख आणि रोहित आसोलकर अश्या १९ मुलानी भाग घेतला. अजून सहा मुलांना अंक घरपोच देण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.