बापर्डे सडेवाडी येथील सखाराम झोरे याचा तळेबाजार येथील तलावात बुडून मृत्यू..!

66

देवगड : तळेबाजार येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या बापर्डे सडेवाडी येथील एकाचा तलावात मृतदेह आढळून आला. सखाराम वाघू झोरे वय 45 असे त्याचे नाव असून ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तळेबाजार येथील तलावात एका व्यक्तीच्या मृतदेह पाण्यात तरंगत असताना तेथील संजय रूमडे या ग्रामस्थांना दिसला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील मुकेश पारकर यांना कळविले. पारकर यांनी देवगड पोलीस स्टेशनला याची कल्पना दिल्यानंतर पोलीस हवालदार राजन जाधव, महेंद्र महाडीक अमीत हळदणकर यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थ रोहित गावकर यांच्या सहकार्याने मृतदेह तलावातून बाहेर काढला. यावेळी तळवडे कॉलेज येथे प्राध्यापक असलेल्या प्रा झोरे यांना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी पाहणी करून हा मृतदेह सखाराम झोरे याचा असल्याचे सांगितले. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. सखाराम झोरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. बापर्डे येथे आई-वडिलांसमवेत ते राहत होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना दारूचे व्यसन होते. त्यांची मुले शिक्षणानिमित्त बाहेरगावी असून तळेबाजार येथे ते तलावाकडे मासेमारी करण्यासाठी आले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करत आहे.