कणकवली : तालुक्यातील कनेडी येथे शिवसेना – भाजपा या दोन पक्षांमध्ये अलीकडेच मोठा राडा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जि. प. च्या माजी. अध्यक्षा संजना सावंत यांनी खास. विनायक राऊत यांनी कनेडी येथे केलेल्या टिकेचा संजना सावंत यांनी सावंत स्टाईलने समाचार घेतला आहे.
यावेळी संजना सावंत अस म्हणाल्या की, खास. विनायक राऊत यांनी आप्पा तावडे यांना गोट्या सावंत यांनी मारहाण केल्याबाबत जो आरोप केला आहे तो आरोप खास. विनायक राऊत यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावा. गोट्या सावंत यांनी आप्पा तावडे यांना मारहाण करतानाचा जर व्हिडिओ दाखवला किंवा एखादा पुरावा दिला व त्यातून आपला आरोप सिद्ध केला तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ.! परंतु जर केलेले आरोप सिद्ध करता आले नाही फक्त आम्हाला नाहक बदनाम करण्याकरीता खास. राऊत यांनी स्टंटबाजी केली तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. असे आव्हान जि. प. माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.
खा. विनायक राऊत यांनी कनेडी येथे केलेल्या टिकेचा संजना सावंत यांनी आपल्या सावंत स्टाईल पद्धतीने चांगलाच समाचार घेतला आहे. एटीएम घोटाळ्यातील प्रमुख आरोपीची बाजू घेऊन खास. विनायक राऊत आपल्यावर टीका करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याचंही संजना सावंत यांनी सांगितलं. तेच विनायक राऊत हे एटीएम घोटाळ्याच्या वेळी आले असते तर ? यांना खरो – खरच जनतेची काळजी आहे, असे म्हणता आले असते. खास. म्हणून दुटप्पी भूमिका त्यांना शोभनीय नाही. उलट गोट्या सावंत आपल्या कार्यालयात बसलेले असताना मुजोर झालेले माजोरी शिवसैनिक हे ३० ते ४० जणांच्या जमावाने भाजपच्या कार्यालयात घुसले व गोट्या सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या घटनेचा मी निषेध करते, असे देखील सावंत यांनी सांगितले. कुडाळ – मालवण मतदार संघाचे आम. वैभव नाईक एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे हातात दांडा घेऊन फिरत होते. त्याचे व्हिडिओ असून देखील ही गोष्ट विनायक राऊत यांच्या दृष्टीस पडली नाही का? उलट कोणताही संबंध नसताना या ठिकाणी येऊन वैभव नाईक यांनी खऱ्या अर्थाने वातावरण बिघडवले आहे. त्या सर्व प्रकरणात काहींच्या दोन कानाखाली मारलं गेलं. कारण काहींचे पाय जमिनीवर येण्याची गरज होती. असाही टोला संजना सावंत यांनी लगावला.
खास. विनायक राउत हे तीन – चार महिन्यांनी कनेडीला आले. मात्र गोट्या सावंत यांचा जनता दरबार हा रोज कनेडीत भरतो. जनतेच्या समस्या त्या नियमित कार्यालयात बसून सोडवीत असतात. सतीश सावंत यांचं गेल्या काही वर्षात असलेलं अस्तित्व हे संजना सावंत व गोट्या सावंत यांच्यामुळे संपत चाललं व या धास्तीतूनच हा सारा प्रकार शिवसेनेने घडवून आणला. असा आरोप देखील सावंत यांनी केला. कागदी वाघ बनलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर हिम्मत असती तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभी राहून मी स्वतः त्यांना बाहेर येण्याची आव्हान दिले. आम. वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे कार्यालयात लपून बसून होते. मात्र त्यांनी बाहेर येण्याची तेव्हा हिम्मत का दाखवली नाही? घोटाळे व फ्रॉड करणारेच लोक खासदार राऊत यांच्यासोबत होते. आम्हाला घोटाळे व गैरव्यवहार करण्याची गरज नाही. जिल्हा परिषद मधील आमचा कारभार हा पारदर्शक असा राहिला आहे.
याउलट आ. वैभव नाईक यांनी देवबाग मध्ये सर्वे नंबर १९९ मध्ये घर नंबर नसताना सुद्ध ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या नावावर निधी लाटलेला आहे. म्हणजेच शासकीय निधी लाटणे, घोटाळे करणे हे आम. वैभव नाईक यांनी केलेले खास. विनायक राऊत यांना चालते का? असा सवाल संजना सावंत यांनी केला. गोट्या सावंत यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कनेडी बाजारपेठेमध्ये माघी गणेश जयंती साजरी केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने अनेकदा सतीश सावंत यांनी गोट्या सावंत यांना काही ना काही कारण समोर करत सत्तेचा गैरवापर करून अडकवण्याचा प्रयत्न केला. असा आरोप देखील संजना सावंत यांनी केला.
तसेच खास. विनायक राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. कारण, गोट्या सावंत यांचा मोबाईल चोरून नेण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यामुळे जर राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार दिला तर अशी चोरी करण्याची वेळ राऊत्यांच्या कार्यकर्त्यांवर येणार नाही, असा टोला देखील संजना सावंत यांनी लगावला आहे.





