कणकवली : तालुक्यात गेले काही दिवस एअरटेल नेटवर्क टॉवर बंद असल्यामुळे शहरातील एअरटेल नेटवर्क ठप्प झाले होते. याबाबत खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक यांनी लक्ष वेधले होते. एअरटेल कंपनीचे मॅनेजर नीरज मोर्ये यांना आम. वैभव नाईक यांनी संपर्क साधून रेग्युलर टॉवरवरून नेटवर्क सुरू होईपर्यंत तात्पुरती नेटवर्कची व्यवस्था करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात एअरटेलचा ट्रकटॉवर उभारण्याचे आश्वासन एअरटेलचे मॅनेजर नीरज मोर्ये यांनी दिले.
कणकवली बांधकरवाडी येथील दत्त मंदिरजवळ गुजरात येथून ट्रकटॉवर दाखल झाला. त्या टॉवरची उभारणीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांत टॉवर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सुशांत नाईक यांनी दिली.
दरम्यान सुशांत नाईक यांनी बांधकरवाडी येथे सुरू असलेल्या टॉवर उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला व संबंधितांना सूचना देखील दिल्या. टॉवरच्या उभारणीमुळे कणकवली बांधकरवाडी, वरचीवाडी, कनकनगरसह अन्य भागांमध्ये एअरटेलच्या नेटवर्कची समस्या मार्गी लागणार आहे. तसेच एअरटेलच्या कायमस्वरूपी टॉवर करता दुसरी जागा निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी देखील कायमस्वरूपी टॉवर उभारणी करण्यात येणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. दरम्यान नेटवर्कसमस्या मार्गी लागत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.





